खळबळजनक! इमारतीवरील पत्रा पडून 4 ते 5 मुले जखमी; फुटबॉल टर्फवर खेळत होती
By अजित मांडके | Published: June 21, 2024 11:28 PM2024-06-21T23:28:05+5:302024-06-21T23:28:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शुक्रवारी रात्री ठाणे शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडल्याने काही ठिकाणी पडझड झाली. या पावसात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शुक्रवारी रात्री ठाणे शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडल्याने काही ठिकाणी पडझड झाली. या पावसात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. गावंड बाग भागात फूटबॉल टर्फवर वाऱ्यामुळे उडून आलेला लोखंडी पत्रा कोसळून तिथे खेळत असलेल्या पैकी चार ते पाच मुले जखमी झाल्याची घटना घडली आहे. मात्र त्यांचे वय समजू शकलेले नाही.
ठाणे शहरात शुक्रवारी रात्री सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. या पावसाने ठाणे शहरात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. लुईसवाडी परिसरात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनांवर वृक्ष पडल्याने वाहनांचे नुकसान झाले. अनेक भागात रात्री विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. शहरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
गावंडबाग भागात फुटबॉल खेळाचे टर्फ आहे. येथील टर्फवर वाऱ्यामुळे उडून आलेला लोखंडी पत्रा कोसळला. यात तिथे फुटबॉल खेळणारी चार ते पाच मुले जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली. या मुलांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. हा पत्रा नेमका कुठून या फुटबॉल टर्फवर आला याबाबत काहीच माहिती समजू शकली नाही.