निवडणूक कामावर बहिष्कार टाका
By admin | Published: January 1, 2016 11:59 PM2016-01-01T23:59:26+5:302016-01-01T23:59:26+5:30
ठाणे महापालिकेच्या २०१७ ला होणाऱ्या निवडणुकीसाठी नव्याने तयार होणाऱ्या वॉर्डांच्या रचनेचे काम ठाणे महापालिकेच्या शिक्षकांच्या माथी मारण्यात येणार असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच
ठाणे : ठाणे महापालिकेच्या २०१७ ला होणाऱ्या निवडणुकीसाठी नव्याने तयार होणाऱ्या वॉर्डांच्या रचनेचे काम ठाणे महापालिकेच्या शिक्षकांच्या माथी मारण्यात येणार असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच शिक्षकांत त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि त्याची दखल घेत या कामावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केले आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर असताना शिक्षकांना या अतिरिक्त कामाला जुंपल्यामुळे पालिकेच्या सर्वच शिक्षकांची मन:स्थिती द्विधा झाली आहे. एकीकडे शाळेचा कार्यभार सांभाळायचा, दुसरीकडे वॉर्डरचनेच्या कामासाठी फिरायचे, अशा दुहेरी कात्रीत सध्या ठाणे महापालिकेचे शिक्षक सापडले आहेत. पूर्वीची पॅनल पद्धत रद्द करून आता ६५ ऐवजी १३० वॉर्ड तयार करण्यात येणार असल्याने वॉर्डांची रचना करण्याचे काम शिक्षकांना देण्यात आले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांदरम्यानही परीक्षा सुरू असताना शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आले होते. शिक्षकांवरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याने शिक्षकांना अशी कामे देण्यात
येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे.