घरीच राहण्याकरिता रुग्णांकडून बहाणेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:29 AM2021-05-28T04:29:30+5:302021-05-28T04:29:30+5:30
कल्याण : आम्ही होम क्वारंटाईन होण्याकरिता फ्लॅट भाड्याने घेतला आहे... घरातील मंडळींना गावाला पाठविले आहे... घरातील मंडळी शेजारील इमारतीत ...
कल्याण : आम्ही होम क्वारंटाईन होण्याकरिता फ्लॅट भाड्याने घेतला आहे... घरातील मंडळींना गावाला पाठविले आहे... घरातील मंडळी शेजारील इमारतीत नातलगांकडे राहायला गेली आहेत... असे बहाणे कोरोना रुग्णांकडून महापालिका कोविड केअर सेंटर अथवा क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचाराकरिता न येता घरीच उपचार घेण्याकरिता केले जात आहेत. राज्य शासनाने होम क्वारंटाईन सुविधा बंद केल्यानंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना महापालिकेच्या कॉल सेंटरमधून फोन आल्यावर वरील उत्तरे दिली जात आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत रुग्णसंख्या कमी झाली असल्यामुळे होम क्वारंटाईनऐवजी कोरोना रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्याची सक्ती केली आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य सुविधा पुरविण्यात हेळसांड झाल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याने कोरोना रुग्णांच्या मनात भीती आहे. त्यामुळे रुग्णालयाऐवजी घरच्या घरी उपचार घेण्यासाठी रुग्णांकडून प्रसंगी खोटी माहितीही कॉल सेंटरला दिली जात आहे.
सहव्याधी असलेल्या कोरोना रुग्णांना घरच्या घरी उपचार करण्यास अजिबात परवानगी दिली जात नाही. या संदर्भातील महापालिकेच्या कॉल सेंटरकडे विचारणा केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांकडे आम्ही रक्तदाब, मधुमेह वगैरे आजार आहेत का, अशी विचारणा करतो. जर तसे आजार असतील तर आम्ही रुग्णालयात दाखल होऊनच कोरोनाचे उपचार घ्यावेत, अशी सक्ती करतो. त्यांना होम क्वारंटाईनची परवानगी देत नाही. राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांना फोन करून रुग्णवाहिका तुम्हाला घ्यायला येईल. तुम्हाला अमुक एका सेंटर अथवा रुग्णालयात दाखल व्हावे लागेल, असे सांगितले जाते. अशावेळी रुग्णांकडून आम्ही आमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने घरच्या घरी उपचार करू व होम क्वारंटाईन होण्याकरिता सोसायटीमधील घर भाड्याने घेतले आहे. आमच्या घरच्या मंडळींना गावी पाठवले असल्याने संसर्गाची भीती नाही. घरात आम्ही एकटेच आहोत. घरातील बाकीच्यांना जवळच्या नातलगांकडे धाडले आहे, अशी कारणे दिली जात आहेत. कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, रुग्णांच्या बोलण्यातून ते खोटी कारणे देत असल्याचे कळते. मात्र रुग्णांशी वाद घालण्यात काही अर्थ नसतो. रुग्णांनी घराऐवजी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यासाठी समुपदेशन केले जाते. मात्र काही वेळा ज्येष्ठ नागरिक आपले घर सोडायला तयार नसतात. माझे जे काही व्हायचे ते घरी माझ्या माणसांत होऊ द्या, असे ते सांगतात. काही तरुण रुग्ण घाबरलेले असतात. अनेकजण घरचे जेवणखाण मिळणार नाही, म्हणूनही रुग्णालयात दाखल व्हायला तयार होत नाहीत.
मात्र घरात उपचार घेण्यावर का भर दिला जात आहे, याबाबत कॉल सेंटर कर्मचाऱ्यांचे म्हणणे असे की, आत्ताच कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. या लाटेत रुग्णांना बेड उपलब्ध झाले नाहीत. इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळाले नाहीत. अनेकांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या भीतीपोटी रुग्ण घरी उपचार घेण्यासाठी आग्रही असतात. मात्र सहव्याधी असलेल्या रुग्णांनी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतले तर ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहतील व प्रकृती बिघडल्यास वेळीच उपचार मिळतील, असे कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्यांचे मत आहे.
........