अंबरनाथमध्ये चोर सोडून संन्याशालाच फाशी

By admin | Published: June 13, 2017 03:21 AM2017-06-13T03:21:43+5:302017-06-13T03:21:43+5:30

शहरातील बेशिस्त रिक्षाचालक आणि बेकायदा व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडणाऱ्या प्रामाणिक

Execution of thieves in Ambarnath and hanging on Sanyabesh | अंबरनाथमध्ये चोर सोडून संन्याशालाच फाशी

अंबरनाथमध्ये चोर सोडून संन्याशालाच फाशी

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : शहरातील बेशिस्त रिक्षाचालक आणि बेकायदा व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडणाऱ्या प्रामाणिक रिक्षाचालकाला पोलिसांच्या दबंगगिरीचाच सामना करावा लागला. वाहतूक पोलीस शिवाजी चौकात कार्यरत असतानाही रिक्षाचालक बेशिस्तपणा करत असल्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न या रिक्षाचालकाने केला होता. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई करण्यासाठी त्याला थेट पोलीस ठाण्यात नेले.
अंबरनाथमधील वाहतूककोंडी दिवसेंदिवस वाढत असून शहरातील प्रमुख चौकांत होणाऱ्या कोंडीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी चौक सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी रिक्षाचालक चुकीच्या पद्धतीने रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात.
रेल्वे स्थानकजवळ असल्याने शिवाजी चौकातून प्रवासी मोठ्या प्रमाणावर येजा करत असतात. येथील चौकात बेशिस्त रिक्षाचालकांनी काही वर्षांपासून बेकायदा थांबे उभारून त्यातून प्रवासी बसवण्यास सुरुवात केली होती. त्यात, रात्रीच्यावेळी हेच रिक्षाचालक चौकात प्रवासी उतरवून इतर प्रवासी भरण्यासाठी उभे राहतात. त्यामुळे पादचारी आणि इतर नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
यावर, कारवाई करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून एक रिक्षाचालक आशीष देशपांडे करत आहेत. यावर काही ठोस होत नसताना याविरुद्ध प्रामाणिक रिक्षाचालकाने लढा उभारला आहे.
बेशिस्त रिक्षाचालक, स्क्र ॅप रिक्षाचालक अशाविरुद्ध दोन वर्षांपासून वाहतूक पोलीस, रस्ते वाहतूक विभाग आणि पोलीस विभागाच्या कार्यालयात जाऊन न्याय मागणारे देशपांडे यांनी या बेशिस्त रिक्षाचालकांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलीस कर्तव्यावर असतानाही रिक्षाचालक आपला मुजोरपणा कायम ठेवत असल्याचे हे चित्रीकरण होते. या चित्रीकरणानंतर वाहतूक पोलीस या बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करेल, असे वाटत असताना या वाहतूक पोलिसांनी उलट देशपांडे यांनाच दमदाटी केली. यावेळी कोंडीच्या ठिकाणी न जाता चौकात उभ्या असलेल्या एका वाहतूक पोलिसाने देशपांडे यांना रागाच्या भरात रिक्षात कोंबले. देशपांडे यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेले. मात्र, स्थानिक पोलिसांना देशपांडेंच्या हेतूबद्दल संशय नसल्याने त्यांनी देशपांडे यांना कोणतीही चौकशी न करता सोडले.

याप्रकरणी अंबरनाथ वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धाटावकर यांना विचारले असता त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची बाजू सावरत रिक्षाचालक हा चित्रीकरण करून कामात अडथळा निर्माण करत असल्याने त्याला पोलीस ठाण्यात नेले होते, असे स्पष्ट केले.

देशपांडे हे बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात असल्याची कल्पना शिवाजीनगर पोलिसांना असल्याने त्यांनी देशपांडे यांना चौकशी न करता सोडून दिले. मात्र, बेशिस्त रिक्षाचालकांना संरक्षण देणाऱ्या संबंधित वाहतूक पोलिसावर कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Execution of thieves in Ambarnath and hanging on Sanyabesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.