लॉकडाऊनमध्ये थकली २२१ कोटींची वीजबिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:25 PM2020-06-16T23:25:23+5:302020-06-16T23:25:31+5:30

ग्राहकांना अचूक बिले पाठविल्याचा महावितरणचा दावा

Exhausted 221 crore electricity bills in lockdown | लॉकडाऊनमध्ये थकली २२१ कोटींची वीजबिले

लॉकडाऊनमध्ये थकली २२१ कोटींची वीजबिले

Next

डोंबिवली : कल्याण परिमंडळात लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिने बंद असलेले वीज मीटर रीडिंग व वीजबिलांचे वाटप सुरू झाले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागांत मीटर रीडिंगनंतर ग्राहकांच्या वीज वापरानुसार अचूक व एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. कल्याण परिमंडळातील लघुदाब ग्राहकांकडे वीजबिलापोटी तब्बल २२१ कोटी थकल्याने महावितरणला आर्थिक चणचण भेडसावत आहे. ग्राहकांनी वीजभरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी मंगळवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर वीज नियामक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार महावितरणने मीटर रीडिंग व वीजबिल वाटप बंद केले. एप्रिल व मे महिन्यांत मीटर रीडिंग घेणे शक्य झाले नसल्याने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांतील वीज वापराच्या सरासरी युनिटप्रमाणे या दोन्ही महिन्यांचे बिल आकारले. एप्रिल व मे महिन्यांत लॉकडाऊन व वाढत्या तापमानामुळे प्रत्यक्षात विजेचा अधिक वापर होता. मात्र, कमी वीज वापर असणाऱ्या महिन्यातील सरासरीप्रमाणे वीजबिल आकारल्याचा दावा महावितरणने केला आहे.
आता प्रतिबंधित भाग वगळता इतर ठिकाणी मीटर रीडिंग घेऊन प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे अडीच महिन्यांचे एकत्रित बिल देण्यात येत असताना हे बिल अधिक असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एकत्रित दिलेल्या बिलात विभाजन करून ग्राहकांना बील भरण्यासाठी काहीशी सवलत दिली आहे. मीटर रीडिंग व वीजबिल यात तफावत असणारी बिले दुरुस्त करून देण्यात येतील. तसेच लॉकडाऊनमध्ये ग्राहकांनी भरलेल्या रकमेची वीजबिलातून कपात केली आहे. यासंदर्भातील सर्व माहितीही वीजबिलात देण्यात आली आहे.

कार्यालयातील गर्दी टाळा : वीजबिलाची दुय्यम प्रत मिळविणे व बिलाच्या दुरुस्तीसाठी वीजग्राहक महावितरणच्या विविध कार्यालयांत सध्या गर्दी करीत आहेत. नोंदणीकृत मोबाइलवर आलेला ‘एसएमएस’ दाखवूनही बिल भरणा केंद्रात वीजबिल भरता येते. तसेच, तक्रारीसाठी महावितरणच्या संकेतस्थळाचा अथवा मोबाइल अ‍ॅपचा वापर करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राहकांनी कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Exhausted 221 crore electricity bills in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज