घोडबंदरच्या वाहतूककोंडीवर चार सर्व्हिस रोडचा उतारा; राजन विचारे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 11:45 PM2020-11-12T23:45:10+5:302020-11-12T23:45:18+5:30
वनविभाग देणार जागा
ठाणे : सध्या पूर्व द्रुतगती मार्गापासून ते घोडबंदर रस्त्यापर्यंत मेट्रोचे काम सुरू असल्याने प्रचंड वाहतूककोंडी होते आहे. यावर उपाय म्हणून बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडचा वापर करता येऊ शकतो. मात्र, या मार्गावर चार ठिकाणी संजय गांधी उद्यानाच्या हद्दीतील जागा असल्याने हे सर्व्हिस रोड पूर्ण करण्यास अडथळा येत होता. आता मात्र वनविभाग ही जागा ठाणे पालिकेस देण्यास तयार झाला असून लवकरच ते बांधून वाहतूककोंडी सुटेल, असे खा. राजन विचारे यांनी सांगितले.
घोडबंदर येथील कोंडीवर उतारा म्हणून ठाणे महापालिकेने पूर्वद्रुत महामार्गाशेजारी सर्व्हिस रोड बांधले. मात्र, तीनहातनाका ते गायमुखपर्यंत असलेल्या सर्व्हिस रोडमध्ये चार ठिकाणी वनविभागाची जागा आहे. ती हस्तांतरणासाठी गेले अनेक वर्षे प्रयत्न सुरू होते. मात्र, ती न झाल्याने ही कामे अनेक वर्षांपासून रखडलेली होती. हा अडथळा दूर करण्यासाठी विचारे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य वनसंरक्षक आणि महापालिका आयुक्त यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्याच अनुषंगाने बुधवारी सायंकाळी त्यांनी जागांची पाहणी केली.