कोंडीवर सहापदरी पुलाचा उतारा - श्रीकांत शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 11:23 PM2019-11-08T23:23:12+5:302019-11-08T23:23:34+5:30
श्रीकांत शिंदे : विठ्ठलवाडी स्मशानभूमी ते पश्चिमेतील भवानी चौकापर्यंत प्रस्तावित
कल्याण : कल्याण पूर्व-पश्चिमेतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी केडीएमसीने पूर्वेतील विठ्ठलवाडी स्मशानभूमी ते पश्चिमेला भवानी चौकापर्यंत सहापदरी उड्डाणपूल उभारण्यासाठी एका खाजगी कंपनीकडून प्रशासकीय सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या पुलासाठी ढोबळ मानाने ३५८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने या पुलाचा प्रस्ताव सरकारदरबारी मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
केडीएमसीच्या स्थायी समिती सभागृहात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी ही माहिती दिली. यावेळी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख विजय साळवी, शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कल्याण पूर्वेतून पश्चिमेत येण्यासाठी पुणे लिंक रोडवरून एफ केबिनजवळ कल्याण-विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वे उड्डाणपूल आहे. हा पूल आनंद दिघे उड्डाणपूल नावाने तयार करण्यात आला आहे. तसेच कल्याण-शहाड रेल्वेस्थानकादरम्यान वालधुनीनजीक एक रेल्वे उड्डाणपूल आहे. हे दोन्ही उड्डाणपूल वाहतूककोंडी सोडविण्यासाठी तयार केले असले, तरी सध्याची वाहतूक पाहता ते अपुरे पडतात. हे दोन्ही उड्डाणपूल दुपदरी आहे. तसेच त्यांना जोडणारे रस्ते अरुंद असल्याने तेथे प्रचंड वाहतूककोंडी होते. त्यामुळे नवीन सहापदरी उड्डाणपूल पूर्वेतील विठ्ठलवाडी स्मशानभूमी ते पश्चिमेतील भवानी चौकापर्यंत प्रस्तावित आहे. सविस्तर प्रकल्प अहवालात महापालिकेच्या विकास आराखड्यात या पुलाची लिंक दिलेली आहे.
कल्याण-मुरबाड रस्ता चारपदरी आहे. तर, कल्याण-बदलापूर रोड हा उल्हासनगरचा काही भाग सोडला तर पुढे चारपदरी आहे. त्याचबरोबर कल्याण-पुणे लिंक रोड हा चारपदरी आहे. मात्र, उड्डाणपूल हे दोनपदरी आहेत. तीन किलोमीटर अंतराच्या सहापदरी उड्डाणपुलाची लिंक तयार करणे गरजेचे होते, असे शिंदे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात सिटी स्कॅन, एमआरआय आदी सेवा पुरवण्यासाठी पीपीपी तत्त्वावर क्रेष्णा डायग्नोस्टिक कंपनीला काम दिले आहे. या कंपनीने सर्व उपकरणे, यंत्रे लावली आहेत. या सेवेचा प्रारंभ महिनाभरात सुरू केला जाईल. कळवा रुग्णालयाच्या धर्तीवर रुग्णांना सरकारी दरात सेवा दिली जाणार आहे.
कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयातही हीच सेवा सुरू केली जाणार आहे. पूर्वेतील महापालिकेच्या हरकिसनदास रुग्णालयात वन रूपी क्लिनिक सुरू केले जाणार आहे. लोकग्राममध्ये व डोंबिवली
पश्चिमेत डायलिसिस सेंटर सुरू
केले जाणार आहे. त्यासाठी निविदा काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. डोंबिवलीतील सूतिकागृहासाठी मागविलेल्या निविदेसाठी तीन जणांचा प्रतिसाद आला आहे. ही निविदा लवकर उघडण्यात येणार आहे.
महापालिका रुग्णालयांतील ११५ रिक्त असलेल्या वैद्यकीय जागांपैकी ४८ जागा भरल्या आहेत. उर्वरित ६७ जागा रिक्त असून, त्यांची भरती सरकारच्या मेगापोर्टलद्वारे करायची असते. त्यामुळे भरतीला सरकारी प्रक्रियेमुळे अडथळा आहे. मात्र, महापालिका रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना ४५ हजार रुपये वेतन दिले जाते. अन्य रुग्णालयांत ६५ हजार वेतन दिले जाते. कमी वेतनामुळे वैद्यकीय अधिकारी भरतीला प्रतिसाद देत नाही. येत्या १४ नोव्हेंबरला होणाºया महापालिकेच्या महासभेत ४५ हजारांऐवजी ६५ हजार रुपये वेतन देण्याचा ठराव मंजूर केला जाणार आहे. त्यानंतर, वैद्यकीय रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.
रेल्वे देणार घरांची रक्कम
केंद्र सरकारच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामुळे कल्याण-डोंबिवलीतील बाधितांना घरे देण्याचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी ठेवला आहे. रेल्वेकडून प्रकल्प बाधितांच्या घरांची रक्कम महापालिकेस दिली जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पबाधितांना बीएसयूपी योजनेतील घरे देण्यास मंजुरी दिली जाणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.