सिडकोच्या मेट्रोचा लवकरच कल्याणपर्यंत विस्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 02:45 AM2017-09-05T02:45:39+5:302017-09-05T02:45:42+5:30
मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने सिडकोने खांदेश्वर ते तळोजा या दुसºया टप्प्यातील प्रकल्पासाठी चाचपणी सुरू केली आहे.
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने सिडकोने खांदेश्वर ते तळोजा या दुसºया टप्प्यातील प्रकल्पासाठी चाचपणी सुरू केली आहे. तिसºया टप्प्याच्या मार्गातील काही तांत्रिक अडचणी लक्षात घेता सिडकोने आता तळोजा ते कल्याण या चौथ्या टप्प्याचा विचार सुरू केला आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी ‘लोकमत’ला दिली.
सिडकोने २0११ मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तीन टप्प्यांत पूर्ण होणारा हा मेट्रो प्रकल्प २१.४५ किमी लांबीचा आहे. त्यासाठी चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. या पहिल्या टप्प्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. सप्टेंबर २0१८ मध्ये या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचा निर्धार सिडकोने केला. त्यासाठी चिनी बनावटीच्या मेट्रो खरेदी केल्या आहेत. त्यापैकी दोन मेट्रो कोच पुढील महिन्यात ट्रायलसाठी सिडकोच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
दुसरा टप्पा ८.३५ कि.मी. लांबीचा आहे. तळोजा एमआयडीसी-कळंबोली-खांदेश्वर मार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे एकूण मार्गापैकी तीन ते चार किमीचा मार्ग एमआयडीसी क्षेत्रातून जाईल. त्यासाठी एमआयडीसीही अनुकूल आहे. त्यामुळे दुसºया टप्प्यालाही लवकरच सुरूवात होण्याचा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. पहिल्या दोन टप्प्यांना जोडण्यासाठी पेंधर ते एमआयडीसी दोन किमी लांबीचा तिसरा टप्पा प्रस्तावित आहे. परंतु, पहिला आणि दुसरा टप्पा पूर्ण होईपर्यंत तिसºया टप्प्याचे काम सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे व्यवहारिकदृष््या सोयीचा ठरणारा तळोजा ते कल्याणपर्यंतचा सुमारे २३ किमी लांबीचा मेट्रोच्या चौथ्या टप्प्याचे काम सुरू करण्याचा सिडकोचा निर्णय आहे. यासंदर्भात अलीकडेच संबंधित विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे गगराणी म्हणाले.
पुढच्या वर्षी बेलापूर ते पेंधर मेट्रोची प्रत्यक्ष सेवा सुरू होईल, असा विश्वास सिडकोला आहे. उर्वरित दोन टप्प्यांचे काम पूर्ण होईतो पहिल्या टप्प्याचा विस्तार कल्याणपर्यंत केल्यास अधिक उपयुक्त ठरेल, असे सिडकोला वाटते.