घरांच्या डेब्रिजसह कचरा विल्हेवाटीसाठी १५ कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:45 AM2021-09-05T04:45:17+5:302021-09-05T04:45:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक अतिवृष्टी जुलैमध्ये झाली आहे. या दोन-तीन दिवसांच्या कालावधीत ठिकठिकाणची घरे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक अतिवृष्टी जुलैमध्ये झाली आहे. या दोन-तीन दिवसांच्या कालावधीत ठिकठिकाणची घरे पडली, भूस्खलन झाले. सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांच्या विल्हेवाटीसाठी तब्बल १५ कोटींपेक्षा अधिक रकमेचा खर्च झाल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.
जुलैतील अतिवृष्टीत जिल्ह्यातील ३१ ठिकाणच्या १८ हजार ५३८ कुटुंबीयांना स्थलांतरित करावे लागले. जिल्हाभरात १६४ पक्क्या, कच्च्या घरांची पडझड झाली. याशिवाय भूस्खलन होऊन काही ठिकाणचे जनजीवनही विस्कळीत झाले. जिल्हाभरातील २४ ठिकाणच्या सार्वजनिक ठिकाणी जमा झालेला कचरा, मातीचे ढिगारे आदी उपसण्यासाठी १५ कोटी दोन लाखांचा खर्च झालेला आहे. यापैकी आतापर्यंत अवघे २५ लाख रुपये या विल्हेवाटीसाठी वाटप झाले आहेत.
या अतिवृष्टीत ३१ ठिकाणी जीवघेणे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. रेल्वे व उपनगरीय वाहतूक बंद करावी लागली होती. या कालावधीत जिल्ह्यात सर्वाधिक कल्याण तालुक्यातील सहा ठिकाणी १४ हजार ९८८ कुटुंबीयांची परवड झाली. अंबरनाथ तालुक्यात चार ठिकाणचे तीन हजार ३१ परिवार आणि शहापूर तालुक्यातील २० ठिकाणी ५१८ कुटुंबीयांना अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसला. या रहिवाशांच्या घरातील चीज वस्तू, भांडी आदी नऊ कोटी २६ लाख ९० हजार रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. मात्र, यापैकी फक्त दोन कोटी ४० लाख ६५ हजारांचे वाटप झाले.
उर्वरित सात कोटी रुपयांची भरपाई अद्याप कागदावरच आहे. जिल्ह्यात १६४ पक्क्या-कच्च्या घरांची पडझड
अतिवृष्टीमुळे १६४ घरांचे नुकसान होऊन पडझड झालेली आहे. यामध्ये १५१ निवासी घरांचा समावेश आहे. यात पक्क्या घरांसह कच्च्या घरांचा आणि झोपड्यांचा समावेश आहे. याशिवाय गाई, म्हशींचे १३ गोठे उद्ध्वस्त झाले आहेत. या तब्बल १६४ घरांच्या दुरुस्तीसाठी आजपर्यंत शासनाकडून भरपाई मिळालेली नाही.
अपेक्षित नुकसानभरपाई
जिल्ह्यात पूर्ण पडझड झालेल्या १४ घरांसाठी १३ लाखांची भरपाई अपेक्षित आहे. पूर्ण पडझड झालेल्या सहा कच्च्या घरांसाठी पाच लाख ७० हजार, १६ झोपड्यांसाठी ९६ हजार, अंशतः नष्ट झालेल्या ६४ पक्क्या घरांचे तीन लाख ८४ हजार आणि अंशतः नष्ट झालेल्या ५१ कच्च्या घरांच्या तीन लाख सहा हजारांच्या नुकसानभरपाईकडे अतिवृष्टीग्रस्तांच्या नजरा लागून आहेत.