अभिवाचन कार्यशाळेचा अनुभव मुलांना सर्वच क्षेत्रात उपयोगी पडणारा, कलाकार सुरभी भावे यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:07 PM2021-02-22T16:07:46+5:302021-02-22T16:08:25+5:30
अभिवाचन ही अशी कला आहे की याचा उपयोग फक्त सिने नाट्य कला क्षेत्रात नाही तर करियरच्या कुठल्याही क्षेत्रात आपले व्यक्तिमत्व प्रभावी करण्यासाठी होतो.
अभिवाचन ही अशी कला आहे की याचा उपयोग फक्त सिने नाट्य कला क्षेत्रात नाही तर करियरच्या कुठल्याही क्षेत्रात आपले व्यक्तिमत्व प्रभावी करण्यासाठी होतो. आपल्या भाव भावना अचूक व्यक्त करण्यासाठी होतो. या कलेचे प्रशिक्षण अशा कार्यशाळांमधून तुम्हाला या योग्य वयात होते आहे ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे, असे प्रतिपादन अनेक टीव्ही मालिकांमधून उत्कृष्ट अभिनयाने गाजलेल्या सुप्रसिद्ध कलाकार सुरभी भावे यांनी केले.
समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने वंचितांच्या रंगमंचाचे प्रणेते दिवंगत साहित्यिक नाटककार रत्नाकर मतकरी यांना आदरांजली म्हणून प्रत्येक महिन्यात मतकरी स्मृती माला आयोजित केली जाते. त्यातील आठव्या पुष्पात लोकवस्तीतील युवकांसाठी प्रत्यक्ष भेटीतील अभिवाचन कार्यशाळा आयोजित केली होती. प्रसिद्ध कलाकार सुप्रिया विनोद यांनी या कार्यशाळेची रुपरेषा तयार केली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी संस्थेच्या अध्यक्ष मनिषा जोशी होत्या. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना कलाकार सुरभी भावे पुढे म्हणल्या की, तुमच्यासाठी वंचितांच्या रंगमंचाने नाट्यकलेच्या अनेक अंगांची दालने उघडून दाखवली आहेत. त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेणे हे तुमच्या हातात आहे. पण आजचा तुमचा उत्साही प्रतिसाद बघून मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच या संधींचे सोने कराल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत एकलव्य कार्यकर्ता दीपक वाडेकर आणि अक्षता दंडवते यांनी केले.
उदंड उत्साहात एकलव्य मुलांचा अभिवाचन कार्यशाळेत सहभाग
या अभिवाचन कार्यशाळेत प्रचंड उत्साहात सहभागी झालेल्या एकलव्य मुलांना सुप्रसिद्ध अभिनेते, गांधी अंतिम पर्व या रत्नाकर मतकरी लिखित नाटकाचे अभिवाचक आणि झी नाट्य गौरवाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त योगेश खांडेकर आणि अनेक व्यावसायिक नाटकात महत्वाच्या भूमिका निभावणारे अभिनेते सुयश पुरोहीत यांनी मार्गदर्शन केले. स्वतः अभिवाचन करून दाखवत, मुलांना आवाजातून भावना प्रकट करण्याचे प्रशिक्षण देत आणि मुलांकडूनही प्रभावी अभिवाचन करुन घेत या दोन संवेदनशील कलाकारांनी मुलांना अडीच तास गुंगवून ठेवले. अतिशय उल्हासात आणि खेळीमेळीत पण कोरोना संदर्भात सर्व काळजी घेऊन पार पाडलेल्या या कार्यशाळेत ठाण्यातील मानपाडा, माजिवडा, कळवा, धर्मवीर नगर, सावरकर नगर आदि ठिकाणच्या विविध लोकवस्तीतील सुमारे ५० मुली - मुलांनी सहभाग घेतला. याआधी साने गुरुजींच्या सोन्या मारुती या ग्रंथाच्या संपादित अंशाचे प्रभावी अभिवाचन सादर करणाऱ्या संस्थेच्या चमुतील मीनल उत्तुरकर यांनी त्यावेळच्या आठवणी जागवत आजच्या कार्यशाळेतून उमगलेले अभिवाचनाचे बारकावे आणि श्वासोश्वासापासून माईक कसा धरायचा इथपर्यंत मिळालेल्या टिप्स बहुमोल असल्याचे सांगितले. संस्थेच्या अध्यक्ष मनिषा जोशी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणल्या की प्रशिक्षकांचा उत्साह आणि मुलांचा तेवढाच उत्साही प्रतिसाद बघून रत्नाकर मतकरी यांनी लावलेल्या वंचितांच्या रंगमंचाचे रोपटे प्रभावीपणे रुजले आहे याची खात्री पटली आणि अशा प्रकारच्या कार्यशाळा या पुढेही आयोजित करण्यासाठी हुरूप आला.
व्यावसायाने कॉर्पोरेट प्रशिक्षक असलेल्या उल्का शुक्ल या वेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यांनी वंचितांचा रंगमंचावरील एकलव्य मुलांसाठी व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळा घेण्याची इच्छा व्यक्त केली. संस्थेचे विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. संस्थेचे खजिनदार सुनील दिवेकर यांनी या कार्यक्रमाची व्यवस्था उत्तम सांभाळली. या वेळी संस्थेचे विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया, विश्वनाथ चांदोरकर आदि मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या हर्षलता कदम, लतिका सु. मो., अनुजा लोहार, सीमा श्रीवास्तव आदींनी विशेष परिश्रम घेतले.