विकासासाठी सर्वपक्षीय एकत्र आल्याचा अनुभव
By Admin | Published: May 29, 2017 06:09 AM2017-05-29T06:09:19+5:302017-05-29T06:09:19+5:30
एखाद्या शहराच्या विकासासाठी केवळ सत्ताधारी पक्षाची भूमिका महत्वाची नसते. शहराचा खरा विकास साधायचा असेल, तर शहरातील
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ: एखाद्या शहराच्या विकासासाठी केवळ सत्ताधारी पक्षाची भूमिका महत्वाची नसते. शहराचा खरा विकास साधायचा असेल, तर शहरातील सर्वच पक्षांनी एकत्रित येण्याची गरज असते. सर्व पक्ष विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आल्यावर शहराचा विकास कसा साधला जातो, याचे उदाहरण अंबरनाथमध्ये दिसत आहे. सर्व पक्षांची सकारात्मक भूमिका आणि प्रशासनाची चोख जबाबदारी यामुळेच अंबरनाथचा विकास साधला जात असल्याचे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
अंबरनाथमधील पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपुजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतरच्या सभेत त्यांनी पालिकेतील बदलत्या वातावरणाचे भरभरुन कौतुक केले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे दोघे सकारात्मक भूमिकेतून पुढे सरकल्यावर खऱ्या अर्थाने रखडलेली कामे मार्गी लागतात. आज अंबरनाथमध्येही मोठ्या प्रमाणात कामे होत आहेत. प्रशासकीय इमारतीसोबतच नाट्यगृह उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शहरातील रस्त्यांची स्थितीही सुधारण्यास मदत होत आहे. अनेक कामे होत असली, तरी त्या कामाचा दर्जाही राखला गेला पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनीही महत्वाची भूमिका बजावली पाहिजे. प्रशासकीय इमारत तयार होत असतांना त्याचा दर्जा चांगला राखण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच शिवमंदिराच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. केवळ शिवमंदिर महोत्सवापूर्ती मंदिर देखणे करण्यात अर्थ नाही. ते मंदिर आणि त्याचा परिसर कायमस्वरुपी देखण झाले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनीही या मंदिराच्या कामासाठी एक कोटींचा निधी देण्याचे मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, शहर प्रमुख अरविंद वाळेकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, वामन म्हात्रे आणि सदाशिव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.