ठाण्यात भरली बालवैज्ञानिकांची ‘प्रयोग’शाळा
By admin | Published: December 21, 2015 01:19 AM2015-12-21T01:19:09+5:302015-12-21T01:19:09+5:30
ठाणे मनपा क्षेत्राच्या ४१व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वीज बचत, पाणी बचत, आपत्कालीन व्यवस्थापन, स्मार्ट सिटी, सौर ऊर्जा अशा अनेक
ठाणे मनपा क्षेत्राच्या ४१व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वीज बचत, पाणी बचत, आपत्कालीन व्यवस्थापन, स्मार्ट सिटी, सौर ऊर्जा अशा अनेक ज्वलंत विषयांवर शालेय विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक प्रयोग सूचवले. विचारलेल्या प्रश्नांना उत्साहाने उत्तरे दिली. आजच्या समस्यांवर या बालवैज्ञानिकांनी शोधलेली उत्तरे कौतुकास्पद असून, भविष्यात विज्ञान क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. माध्यमिक शिक्षण विभाग जि. प., ठाणे, ठाणे शहर माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा सहशालेय उपक्रम समिती व श्रीरंग विद्यालय इंग्रजी माध्यम, माध्यमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार, दि. १७ ते शनिवार, दि. १९ डिसेंबर या कालावधीत श्रीरंग विद्यालयाच्या भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विज्ञान प्रदर्शन दालनात बालवैज्ञानिकांनी आपल्या प्रयोगांद्वारे वेगवेगळे विषय मांडले, त्यातील काही प्रयोगांवरचा प्रकाशझोत...
शाळा : ब्राह्मण शिक्षण मंडळाचे वर्तकनगर माध्यमिक विद्यालय, ठाणे
घरामधील निरुपयोगी प्लॅस्टीकचा ई कचरा व निरुपयोगी प्लॅस्टीकचा वापर करून या विद्यार्थ्यांनी उपयोगी वस्तू तयार केल्या आहेत. सीडी, फेविस्टिक, खेळण्यातील मोटर, एक्सरे फिल्म, माचीस बॉक्स आदी वस्तूंपासून टेबल फॅन व एक्सझॉस्ड फॅन तयार केले आहे. या टेबल फॅनच्या पाती समोर फिरवल्या असता याची हवा समोर लागते. तसेच, या फॅनची बॅटरी उलट लावली की याची हवा मागे लागते. एक्स्झॉस्ड फॅनच्याबाबतीत ही उलट प्रक्रिया आहे.
शाळा : श्रीरंग विद्यालय,
मराठी माध्यम, ठाणे
गणित विषय म्हटला की, अनेक विद्यार्थ्यांना या विषयाची भीती वाटते. अनेकदा पाढे पाठ नसल्यामुळे गणिताची उत्तरे शोधतानादेखील चुका होतात. कैक वेळा पाढे पाठ करण्याचा कंटाळा केला जातो. या विषयाची भीती काढून टाकण्यासाठी श्रीरंगच्या विद्यार्थ्यांनी हसत खेळत गणित शिकवणारा प्रकल्प तयार केला आहे. पाढे तयार करण्यासाठी वर्तुळ, त्रिकोण, चौकोनाच्या गुणधर्माचा वापर करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होऊ शकतो, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.