ठाणे जिल्ह्यात दहीहंडीत घुसळून निघाले ३०० कोटींचे ‘लोणी’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 07:12 AM2023-09-08T07:12:37+5:302023-09-08T07:12:54+5:30

मोठ्या मानाच्या हंड्यांच्या आयोजनाची तयारी किमान पंधरा दिवस अगोदर सुरू होते.

Experts estimate that there is a turnover of 275 to 300 crore rupees during Dahi Handi in Thane. | ठाणे जिल्ह्यात दहीहंडीत घुसळून निघाले ३०० कोटींचे ‘लोणी’

ठाणे जिल्ह्यात दहीहंडीत घुसळून निघाले ३०० कोटींचे ‘लोणी’

googlenewsNext

- संदीप प्रधान

ठाणे : ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक दहीहंड्यांची संख्या २८४ असून नोंदणीकृत गोविंदा मंडळांची संख्या २१२ आहे. मानाच्या मोठ्या बक्षिसांच्या हंड्यांची संख्या १४ आहे. दहीहंडीचा हा वाढलेला पसारा पाहता ठाण्यात दहीहंडीनिमित्त २७५ ते ३०० कोटी रुपयांची उलाढाल होते, असा जाणकारांचा अंदाज आहे.

मोठ्या मानाच्या हंड्यांच्या आयोजनाची तयारी किमान पंधरा दिवस अगोदर सुरू होते. काही बडे राजकीय नेते याकरिता इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मदत घेतात. भव्य व मजबूत व्यासपीठ, प्रकाशयोजना, एलईडी स्क्रीन, डीजे, दहीहंडी उंचावर लावण्याकरिता क्रेन, अत्याधुनिक साउंड सिस्टीम, दहीहंडीचे व्हिडीओ शूटिंग, सेलिब्रिटी, लावणीसम्राज्ञींचे नृत्य, गोविंदा पथकांकरिता टी-शर्ट, जेवणाची व्यवस्था, गोविंदांच्या सुरक्षेचा खर्च, वाहिन्यांवर प्राइम टाइमला आपली दहीहंडी दिसावी याकरिता स्लॉट बुकिंग अशा असंख्य बाबींकरिता लाखो रुपये खर्च केले जातात. याखेरीज बक्षिसाची रक्कम लाखोंच्या घरात असते. 

गोविंदा पथकांनाही वातानुकूलित बसगाड्या, गोविंदांचा नाश्ता व जेवण, टी-शर्ट, प्रथमोपचाराचे साहित्य आदी विविध बाबींवर पैसे खर्च करावे लागतात. दहीहंडी या राजकीय नेत्यांकडील काळा पैसा पांढरा करण्याचा एक मार्ग असल्याचे ठाण्यातील एका सीएने सांगितले. काही राजकीय नेते स्थानिक कंपन्या, बिल्डर, मोठे ब्रँडेड वस्तू विकणारे दुकानदार यांच्याकडून बक्षिसे, व्यासपीठ अशा वेगवेगळ्या गोष्टींकरिता प्रायोजकत्व घेतात. नेते अनेकदा कलाकारांची काही महत्त्वाची कामे करतात. समजा एखाद्या कलाकाराला केलेल्या कामाचे मानधन मिळत नसेल तर नेते मांडवली करून देतात. अशा केलेल्या उपकारांतून उतराई होण्याकरिता काही कलाकार नाममात्र मानधन घेऊन नेत्यांच्या दहीहंडीला पायधूळ झाडतात.

काहीवेळा नेते आपल्या दहीहंडीचे महत्त्व वाढविण्याकरिता घसघशीत मानधन देऊन कलाकार बोलवतात. दहीहंडीचे आयोजन ही आगामी निवडणुकीतील मतांची बेगमी करण्याचा मार्ग आहे. बक्षिसाच्या रकमा, टी-शर्ट या माध्यमातून तरुणवर्ग नेत्याशी जोडला जातो. मतदारांनाही आकर्षित करण्याकरिता दहीहंडीतील तामझामचा लाभ होतो. निवडणूक जाहीर झाल्यावर आचारसंहिता लागल्यावर उमेदवारांच्या खर्चावर बंधने येतात. मात्र, दोन निवडणुकांच्या मध्ये दरवर्षी दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव वगैरे उत्सव, ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा यावर आमदार, खासदार कोट्यवधी रुपये खर्च करतात.

     ठाणे जिल्ह्यातील एकूण दहीहंडी १४३१
     सार्वजनिक दहीहंड्या २८४
     मानाच्या मोठ्या हंड्या १४
     छोट्या दहीहंडीचा खर्च ५ ते १० हजार
     सार्वजनिक दहीहंडीचा खर्च एक ते तीन लाख
     मोठ्या मानाच्या हंडीचा खर्च ७० लाख ते एक कोटी 

Web Title: Experts estimate that there is a turnover of 275 to 300 crore rupees during Dahi Handi in Thane.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.