माहिती अधिकारात उघड, तीन उड्डाणपूल धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 04:37 AM2017-08-28T04:37:58+5:302017-08-28T04:38:31+5:30
भिवंडी- कल्याण- शीळ या प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यावरील तीन पूल धोकादायक बनले असून त्यातील काटईचा पूल दुरूस्तीपलिकडे गेलेला असतानाही त्यावरून बिनधास्त अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास संकटात सापडला आहे.
मुरलीधर भवार
कल्याण : भिवंडी- कल्याण- शीळ या प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यावरील तीन पूल धोकादायक बनले असून त्यातील काटईचा पूल दुरूस्तीपलिकडे गेलेला असतानाही त्यावरून बिनधास्त अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास संकटात सापडला आहे. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी ही बाब उघडकीस आणली आहे.
या २१ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील देसाई खाडी पूल, काटईतील रेल्वेवरील पूल आणि पत्री पूल हे धोकादायक बनल्याचा अहवाल राज्य रस्ते विकास महामंडळाने कल्याण वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांना ३ आॅगस्टला दिला आहे. काटईचा पूल तर दुरुस्ती करण्यापलिकडचा आहे, असे स्पष्ट झाल्यानंतरही तो डागडुजी करून वापरात आहे. या पुलावरून जड आणि अवजड वाहनांची वाहतूक करणे धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आल्यानंतरही ती वाहतूक बिनदिक्कत सुरु आहे.
भिवंडी-कल्याण-शीळ हा रस्ता मुंबई-पुणे, मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणारा दुवा असल्याने त्यावर वाहतुकीचा प्रचंड भार आहे. या रस्त्यालगत भिवंडी, कोन, कल्याण, डोंबिवली, शीळ परिसरात नवनवी गृहसंकुले उभी राहत असल्याने वाहतुकीचा ताण सतत वाढतो आहे.
या रस्त्यावर देसाई गावाजवळ खाडीवरील उड्डाणपूल दुपदरी आहे. तोही कमकुवत आहे. तेथील आधीचा पूल पडल्यानंतर हा नवा पूल उभारण्यात आला होता. तो बांधतानाच दुपदरी न बांधता चौपदरी बांधावा अशी मागणी झाली होती. पण ती अव्हेरल्याने पुन्हा पूल बांदण्याची वेळ येणार आहे. दिवा-पनवेल मार्गावर काटईचा उड्डाणपूल आहे. रेल्वेने १९६२ मध्ये तो उभारला. पुलाचे आयुर्मान संपल्याने त्याची दुरुस्ती शक्य नसल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाने रेल्वेला १ आॅगस्ट २०१५ ला कळवले. त्यानंतर रेल्वेने त्याची दुरूस्ती केली. त्यानंतरही तो जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सध्या त्यावरून शीळच्या दिशेची वाहतूक होते. त्या शेजारचा पूलही पुरेसा रूंद बांधण्यात आलेला नाही.
ब्रिटिशांच्या काळात कल्याणला उभारलेला पत्री पूलही जड आणि अवजड वाहतुकीसाठी धोकादायक आहे. शीळ, डोंबिवलीहून कल्याणकडे येणारी वाहतूक या पुलावरून होते.
या तिन्ही पुलांची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. पण सरकारकडून त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सरकार अपघात होण्याची वाट पाहात असल्याची टीका माहिती अधिकाराचे कार्यकर्ते घाणेकर यांनी केली आणि तिन्ही पूल नव्याने बांधून होईपर्यंत त्यावरील जड व अवजड वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी केली.