सच्च्या कार्यकर्त्यांचा उलगडला प्रवास, संवादसंध्येत ठाण्यात साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 05:18 PM2019-08-11T17:18:27+5:302019-08-11T17:23:02+5:30
विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मान्यवरांमध्ये दडलेल्या अपरिचित कार्यकर्त्यांचा प्रवास उलगडण्यात आला.
ठाणे : कार्यकर्ता या भूमिकेतून विविध क्षेत्रांत तळमळीने काम करुन लोकप्रिय झालेल्या सच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यात आला. यावेळी सिने नाट्य जगतातील परोपकारी मित्र जयवंत वाडकर, आनंदयात्रीच्या माध्यमातून विधायक कामे करणारा समाजसेतू किरण वालावलकर, मुरबाड - जव्हार - वाडा परिसरातील आदीवासींसाठी काम करणारे डॉ. अरुण पाटील, ग्रंथालय चळवळीत अविरत कार्यरत असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व विद्याधर ठाणेकर यांनी आपल्या कार्याचा प्रवास उलगडला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या ठाणे जिल्हा केंद्रातर्फे ‘मी कार्यकर्ता’ या संवादसंध्याचे मंगला हायस्कूल येथे आयोजन केले होते. जयवंत वाडकर म्हणाले, मला आजही क्रिकेटचे वेड आहे. मी आधीपासूनच कार्यकर्ता आहे. मला सुदैवाने चांगले दिग्दर्शक मिळाले. मला दामू केंकरे यांचा तुझ्यावाचून करमेना हा पहिला चित्रपट मिळाला. डिसेंबर पर्यंत एखादे नाटक करण्याचा मानस आहे असे सांगताना ते म्हमाले पुरस्कार तुम्हाला मिळाले पाहिजेत कारण ते तुम्हाला पुढे नेतात. तसेच, भविष्यात वेब सिरीजला चांगले दिवस असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मुरबाड - जव्हार - वाडा परिसरातील आदीवासींसाठी काम करणारे डॉ. अरुण पाटील यांनी त्यांच्या कार्याचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, कार्यकर्त्यामध्ये झोकून देऊन काम करण्याची वृत्ती असली पाहिजे. ग्रंथालय चळवळीत काम करणारे विद्याधर ठाणेकर यांनी मराठी ग्रंथ संग्रहालय वाचन संस्कृती वाढविण्यासाठी राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. केवळ तरुणांनी नाही तर प्रत्येकाने वाचन केले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. आनंदयात्रीच्या माध्यमातून काम करणारे किरण वालावलकर म्हणाले, कोणतेही काम करा पण ते झोकून करा असा कानमंत्र दिला. समारंभाध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर म्हणाले, कार्यकर्ते हे तीन प्रकारचे असतात एक म्हणजे सतरंजी उचलणारे जे तिथेच राहतात दुसरे जे काहीही कार्य करीत नाही फक्त होर्डींग्ज लावतात आणि तिसरे म्हणजे शांतपणे काम करणारे असतात. लतिका भानुशाली आणि पौर्णिमा शेंडे यांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अध्यक्ष मुरलीधर नाले व सचिव अमोल नाले उपस्थित होते.