कल्याणमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:43 AM2021-09-18T04:43:19+5:302021-09-18T04:43:19+5:30

कल्याण : पश्चिमेतील कोळीवली गावातील श्री कॉम्प्लेक्सजवळील शिसोदिया आर्केड या सात मजली इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कृष्णकुमार बैनीवाल यांच्या ...

Explosion of domestic gas cylinder in Kalyan | कल्याणमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट

कल्याणमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट

Next

कल्याण : पश्चिमेतील कोळीवली गावातील श्री कॉम्प्लेक्सजवळील शिसोदिया आर्केड या सात मजली इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कृष्णकुमार बैनीवाल यांच्या घरात गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गॅसची गळती होऊन सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. त्यात कृष्णकुमार हे गंभीर जखमी झाले. यानंतर घराला लागलेल्या भीषण आगीत घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.

बैनीवाल हे घरी एकटेच असताना अचानक गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. त्यामुळे भिंतींनाही तडे गेले, त्याचबरोबर मोठी आगही लागली. या घटनेची माहिती तातडीने केडीएमसीच्या अग्निशमन दलाला कळवताच ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या आगीच्या भीषणतेमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आतमध्ये जाता येत नव्हते. मात्र, जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आणि जीवाची बाजी लावून स्फोट झालेला आणि त्याच्याशेजारी असणारा आणि गळती होत असलेला आणखी एक असे दोन्ही गॅस सिलिंडर घराबाहेर काढले. त्यानंतरही दोन्ही सिलिंडरमधून मोठ्या प्रमाणात गळती सुरूच होती. त्यापैकी एका गॅस सिलिंडरमध्ये चमचा अडकल्याचे जवानांना आढळून आले. हा चमचा बाहेर काढताच काही प्रमाणात गळती कमी झाली. तरीही धोका कायम असल्याने दोन्ही सिलिंडर आधारवाडी अग्निशमन केंद्रावर आणले गेले.

पाऊण तास दिली आगीशी झुंज

- सिलिंडरचा स्फोट इतका भीषण होता की, घराच्या भिंतींचे, स्लायडिंगचे, खिडकीच्या चौकटीचे आणि इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर जखमी झालेल्या कृष्णकुमार यांची पत्नी आणि मुलगा सोसायटीत खाली असल्याने त्या दोघांना कोणतीही दुखापत झाली नाही.

- अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी नामदेव चौधरी, केंद्रप्रमुख विनायक लोखंडे, लिडिंग फायरमन सुनील मोरे यांच्यासह अन्य जवानांनी पाऊण तास झुंज देत ही आग आटोक्यात आणली आणि पुढचा मोठा अनर्थ टळला.

------------------------------------

Web Title: Explosion of domestic gas cylinder in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.