मुंब्य्रातून स्फोटकांचा साठा जप्त, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 06:26 PM2017-08-07T18:26:32+5:302017-08-07T18:26:41+5:30
मुंब्रा पोलिसांनी स्फोटकांचा साठा जप्त केला असून, याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. मुंब्रा येथील एका व्यक्तीशी आरोपींचा वैयक्तिक वाद होता. त्याचा काटा काढण्यासाठी आरोपींनी हा कट रचल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे, दि. 7 - मुंब्रा पोलिसांनी स्फोटकांचा साठा जप्त केला असून, याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. मुंब्रा येथील एका व्यक्तीशी आरोपींचा वैयक्तिक वाद होता. त्याचा काटा काढण्यासाठी आरोपींनी हा कट रचल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुंब्रा-पनवेल मार्गावरील गौसिया कंपाऊंडसमोर स्फोटकांचा साठा असल्याची माहिती कल्याण येथील रेल्वे सुरक्षा दलास मिळाली होती. त्यानुसार रविवारी पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास रेल्वे सुरक्षा दल, दहशतवादविरोधी पथक आणि शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या अधिका:यांनी संयुक्त कारवाई करून स्फोटकांचा साठा जप्त केला. गौसिया कंपाऊंडसमोरील एम.डी. डेव्हलपर्सच्या आवारात एका भंगार कारमध्ये पोलिसांना प्लास्टिकच्या गोणीमध्ये 10 किलो अमोनियम नायट्रेट आणि पिवळय़ा रंगाची वायर लावलेले 9 सुप्रिम डिटोनेटर्स बेवारस स्थितीत आढळले.
पोलिसांनी तातडीने सुत्रे हलवून अवघ्या 10 तासात याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली. महिंसा राजेसाब गणुर उर्फ महेश (वय 40), शहाआलम मेहमूद शेख (वय 32) आणि आरिफ नवाबअली खान (वय 23) ही आरोपींची नावे असून, तिघेही मुंब्रा येथील रहिवासी आहेत.
आरोपी महेश याचा जुन्या गाडींची खरेदी-विक्री करणारे मुंब्रा येथील रहिवासी इस्माईल शेख यांच्याशी आर्थिक वाद होता. त्यांना गंभीर गुन्ह्यात अडकवण्यासाठीच आरोपींनी हे कटकारस्थान रचले होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त सत्यनारायण आणि डॉ. डि.एस. स्वामी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.