रसायने, दागिन्यांद्वारे ठाणे जिल्ह्याला बनविणार निर्यातक्षम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:44 AM2021-09-27T04:44:39+5:302021-09-27T04:44:39+5:30
ठाणे : जिल्ह्यात रसायने, सोन्याचे दागिने, रत्न, अभियांत्रिकी साधनसामग्री, यंत्र, वस्त्रोद्योग आदी या क्षेत्रांचा एक जिल्हा एक उत्पादन या ...
ठाणे : जिल्ह्यात रसायने, सोन्याचे दागिने, रत्न, अभियांत्रिकी साधनसामग्री, यंत्र, वस्त्रोद्योग आदी या क्षेत्रांचा एक जिल्हा एक उत्पादन या योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. या साधन सामग्रीसह उत्पादने, दागदागिन्यांद्वारे ठाणे जिल्ह्याला निर्यातक्षम बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा सूर वागळे इस्टेटमधील एक्स्पोर्ट काॅन्क्लेव्ह व प्रदर्शनात ऐकायला मिळाला.
वागळे इस्टेट येथे शुक्रवारी आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत परराष्ट्र व्यापार महासंचालनालय व ठाणे जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एक्स्पोर्ट काॅन्क्लेव्ह पार पडली.
या कार्यशाळेचे उद्घाटन परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाचे सहायक संचालक अविल डिमेलो यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले की, ठाणे जिल्हा हा जल, रस्ते व हवाई वाहतूक साधनांशी जोडला गेला आहे. या जिल्ह्यात उद्योगांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील निर्यातीत ठाणे जिल्हा हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. यास अनुसरून राज्य शासनाचे निर्यातीला चालना देण्याचे धोरण आहे. पुढील काळात परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्यातील उद्योगांनी निर्यात क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन डिमेलो यांनी उपस्थित उद्योजकांना केले.
अध्यक्षीय भाषणात डिमेलो यांनी विदेश व्यापार महासंचालनालयाच्या मार्फत निर्यातीसाठी देण्यात येणाऱ्या सवलती व योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यातील एक तरी उत्पादन जागतिक स्तरावर ओळखले जावे, यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. ठाणे जिल्ह्यात रत्न-दागिने उद्योग, रसायने, अभियांत्रिकी व वस्त्रोद्योग आदी क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या उत्पादनांना विदेशात पाठविण्यासाठी उद्योजकांनी प्रयत्नशील राहण्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे.
-------
उद्योजकांना दिले धडे
वागळे इस्टेट येथे झालेल्या प्रदर्शन व कार्यशाळेत उद्योजकांना निर्यातीच्या दृष्टीने धडे देऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या उपाध्यक्षा सुजाता सोपरकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक देवदत्त रोकडे, विजू शिरसाट, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक वृषाली सोने आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत विविध क्षेत्रांत असलेल्या निर्यात संधी, निर्यातीसाठी लागणारे परवाने, आर्थिक बाबींविषयी माहिती देण्यात आली. लघु व सूक्ष्म उद्योजकांसाठी असणाऱ्या योजनांचीही माहिती देण्यात आली. यावेळी निर्यातविषयक प्रदर्शन भरवण्यात आले होते. ठाणे जिल्ह्याचा निर्यात कृती आराखड्याचा मसुदा तयार आहे. काेणाच्या काही सूचना असतील तर त्या कळवाव्यात. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उत्पादनांना निर्यातक्षम बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोने यांनी सांगितले.