एक्स्प्रेस गाड्यांना हवाय कर्जत, दिवा स्थानकात थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:41 AM2021-07-30T04:41:39+5:302021-07-30T04:41:39+5:30
अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये, यासाठी सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी उपनगरी लोकलची दारे ...
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये, यासाठी सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी उपनगरी लोकलची दारे अजूनही बंदच आहेत. त्यातच दुसरीकडे काही लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना कर्जत स्थानकात थांबा नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. गडक, कोणार्क, हैदराबाद, सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाड्यांना कर्जत, तर दिवा स्थानकात कोकण रेल्वेवरील सर्व गाड्यांना थांबा देण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
रेल्वेने एक्स्प्रेस गाड्यांची संख्या वाढवली असली तरी त्यांचे थांबे मात्र वाढविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढवूनही प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, कसारा, तर रायगड जिल्ह्यातील कर्जत ही लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी महत्त्वाची स्थानके आहेत. दक्षिण भारतात जाणाऱ्या अनेक गाड्यांना कर्जत स्थानकात थांबा नाही. त्यामुळे कल्याण ते कर्जत- खोपोलीदरम्यानच्या प्रवाशांना कल्याण स्थानक गाठून या गाड्यांनी आपला इच्छित स्थळी प्रवास करावा लागत आहे. त्यात त्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे. शिवाय कोरोनाकाळात तर हा प्रवास अवघड झाला आहे. दुसरीकडे दिवा जंक्शन हे स्थानक तर कोकण रेल्वेचे प्रवेशद्वार आहे. या स्थानकात कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्या थांबवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे; पण रेल्वे प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
------
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
मुंबईतून सध्या उत्तर भारतात दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रेदश, बिहार, दुसरीकडे पश्चिम बंगालपर्यंत गाड्या धावत आहेत. दक्षिणेकडे चेन्नई, हैदराबाद, बंगळुरूपर्यंत गाड्या धावत आहेत. कोकण रेल्वेमार्गावर कोकण तसेच गोवा, केरळपर्यंत एक्स्प्रेस गाड्या सुरू आहेत, तसेच राज्यांतर्गतही गाड्या सुरू झाल्या आहेत.
------------------
कर्जतला या गाड्या थांबणार कधी?
हैदराबाद एक्स्प्रेस
कोयना एक्स्प्रेस
सिद्धेश्वर एक्स्प्रेस
कोणार्क एक्स्प्रेस
गडक एक्स्प्रेस
-------------
कर्जत स्थानकात डेक्कन एक्स्प्रेसचा अधिकृत थांबा होता. कोविडकाळात आताच पुन्हा गाडी सुरू झाल्यानंतर मात्र हा थांबा काढण्यात आला आहे. त्यातही कल्याण- पुणे मार्गावर कर्जत स्थानक महत्त्वाचे असून खोपोली, बदलापूर ते नेरळ पट्ट्याला जोडणारे स्थानक, अशी त्याची ख्याती आहे. त्यामुळे या स्थानकातील लांब पल्ल्याच्या गाड्यांचे थांबे तत्काळ सुरू करायला हवेतच.
-पंकज ओसवाल, रेल्वे प्रवाशांच्या समस्येवर आवाज उठवणारे कार्यकर्ते
------
कोविडकाळात अनेक गाड्या सुरू झाल्या आहेत; परंतु त्यांना कर्जतचा थांबा दिलेला नाही. कर्जतला मोठी बाजारपेठ असून, दररोज पुण्याला जाणाऱ्या शेकडो प्रवाशांची गैरसोय होत आहे. जास्तीत जास्त गाड्या या स्थानकात थांबायला हव्यात.
-नितीन परमार, उपाध्यक्ष उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ
------------
कोविडकाळात लांब पल्ल्याच्या सगळ्या मार्गांवर गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. पूर्वीसारखे थांबे नजीकच्या काळात पुन्हा सुरू होतील. वरिष्ठ पातळीवरून गाड्यांचे थांबे विविध अहवाल घेऊन ठरवण्यात येतात. त्यानुसार अनलॉकचे टप्पे जसजसे जाहीर होत जातील, तसतसे बदल निश्चितच केले जातील; परंतु आताच काही सांगता येणार नाही.
-रेल्वे अधिकारी
------------