रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
By सदानंद नाईक | Published: September 21, 2024 10:03 PM2024-09-21T22:03:33+5:302024-09-21T22:05:15+5:30
भालेराव हे शरद पवार यांच्या संपर्कात
सदानंद नाईक, उल्हासनगर: रिपाईं आठवले गटाचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी करून शहर जिल्हा कार्यकारणी बरखास्त केल्याची माहिती पक्षाचे नेते सुरेश बारसिंगे यांनी पत्रकारांना दिली. भालेराव यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याने, ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर रिपाइं आठवले गटाचे शहरजिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनी गेल्या वेळी पक्षाचे आदेश डावलून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढविली होती. एकहाती शहर पक्षाची कमांड सांभाळणाऱ्या भालेराव यांनी पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. पक्षाकडून नकार घंटा आल्यावर, त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली. भालेराव ऐन निवडणुकी दरम्यान शरद पवार यांच्या सोबत जाणार असल्याचे अटकले बांधले जात असतांना शुक्रवारी पक्षाचे नेते सुरेश बारसिंगे यांनी सोशल मीडियावर भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती दिली. तसेच शहर कार्यकारिणी बरखास्त केल्याचे सांगितले. या कारवाईने रिपाइंला धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत भगवान भालेराव यांच्याशी संपर्क केला असता, आपण उल्हासनगर मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहे. असे भालेराव म्हणाले. महायुतीकडून उमेदवारी दिली जाणार नसल्याने, आपण जेष्ठ नेते शरद पवार यांची गेल्या महिन्यांत भेट घेतली. तसेच बहुतांश शहर कार्यकारणी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते माझ्या सोबत असल्याचे भालेराव म्हणाले. उल्हासनगरात रिपाइं आठवले गटाला मानणारा मोठा वर्ग असून इतर रिपाइं गटा पेक्षा आठवले गटाची ताकद मोठी आहे. भविष्यात भालेराव यांच्या मागे पदाधिकारी जातात की पक्षप्रमुख आठवले यांच्या सोबत राहतात. हे काही दिवसातच उघड होणार आहे.