विस्तारित ठाण्याला रेल्वेच्या अटींचा खोडा
By Admin | Updated: June 4, 2016 01:36 IST2016-06-04T01:36:17+5:302016-06-04T01:36:17+5:30
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ठाणे-मुलुंडदरम्यान मेंटल हॉस्पिटलच्या जागेवरील नवीन विस्तारित रेल्वे स्थानकाला मध्य रेल्वेने मंजुरी दिली असल्याची माहिती महाव्यवस्थापक

विस्तारित ठाण्याला रेल्वेच्या अटींचा खोडा
ठाणे : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ठाणे-मुलुंडदरम्यान मेंटल हॉस्पिटलच्या जागेवरील नवीन विस्तारित रेल्वे स्थानकाला मध्य रेल्वेने मंजुरी दिली असल्याची माहिती महाव्यवस्थापक एस.के. सूद यांनी खासदार राजन विचारे यांना पत्राद्वारे कळवली आहे. पण खर्चाचा, पुनर्वसनाचा मुद्दा रेल्वेने आपल्या अंगावर न घेतल्याने प्रकल्पातील तो खोडा कायम आहे.
विचारे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने नवीन रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्याची मागणी केली होती. त्यावर, प्रभू यांनी नोडल आॅफिसर म्हणून मुख्य प्रशासकीय अधिकारी एम.के. गुप्ता यांची नियुक्ती करून त्यांना अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गेल्या आठवड्यात ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल व रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी एम.के. गुप्ता यांच्यात बैठक झाली. त्यात बालाजी रेल रोड सिस्टीम लि. या सल्लागार संस्थेने केलेला आराखडा सादर करण्यात आला. हा प्रकल्प संयुक्तपणे राबवण्यास उभयतांनी सहमती दर्शवली. सूद यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, एमएमआरव्हीसीच्या सर्वेक्षणानुसार ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज ६ लाख ५० हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यासाठी महापालिकेने सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. (प्रतिनिधी)