कायम खंडित वीजपुरवठा धारक ग्राहकांसाठी अभय योजनेस ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ!
By नितीन पंडित | Published: October 10, 2022 06:48 PM2022-10-10T18:48:55+5:302022-10-10T18:49:16+5:30
महावितरणने कायमस्वरूपी खंडित मीटरची महावितरण कंपनीकडील जुनी रक्कम थकबाकी असलेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना राबविली असून यामध्ये मार्च ते ऑगस्ट २०२२ हा कालावधी निश्चित केला होता.
भिवंडी : कायम खंडित वीजपुरवठा धारक वीज ग्राहकांना आपल्याकडील थकीत वीजबिल भरण्यासाठी व्याजदरात सूट असलेली स्व. विलासराव देशमुख अभय योजनेस ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती टोरेंट पॉवर कंपनीचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदयानी यांनी सोमवारी दिली आहे.
महावितरणने कायमस्वरूपी खंडित मीटरची महावितरण कंपनीकडील जुनी रक्कम थकबाकी असलेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना राबविली असून यामध्ये मार्च ते ऑगस्ट २०२२ हा कालावधी निश्चित केला होता. मात्र अनेक ग्राहकांना या योजनेच्या मर्यादित कालावधीमुळे त्यांना योजनेचा लाभ घेता येत नसल्याने मुदत वाढविण्याची विनंती केली होती. त्यानंतर महावितरण कंपनीने त्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत वाढ केली आहे.
या योजने मध्ये महावितरण थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांना शंभर टक्के व्याज माफी देऊन ग्राहक केवळ मूळ रक्कम भरून त्यांच्या जमा झालेल्या थकबाकीतून मुक्त होऊ शकतात. त्यामुळे ज्या ग्राहकांनी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज केले आहेत, मात्र रक्कम भरू शकले नाहीत, त्यांनाही आता या मुदत वाढीमुळे एक रक्कमी अथवा हप्त्या द्वारे आपल्या थकीत विजबिलाची रक्कम भरण्याची संधी मिळालेली असून थकीत वीज ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन टोरेंट पॉवरकडून करण्यात आले आहे.