वीज बिल अनुदानासाठी मिळाली मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:39 AM2021-03-19T04:39:44+5:302021-03-19T04:39:44+5:30

भिवंडी : महाराष्ट्रातील यंत्रमागधारकांना वीज बिल अनुदान सवलत मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढविण्यात आली असल्याची माहिती ...

Extension received for electricity bill subsidy | वीज बिल अनुदानासाठी मिळाली मुदतवाढ

वीज बिल अनुदानासाठी मिळाली मुदतवाढ

Next

भिवंडी : महाराष्ट्रातील यंत्रमागधारकांना वीज बिल अनुदान सवलत मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढविण्यात आली असल्याची माहिती भिवंडी पद्मानगर पॉवरलूम व्हीवर्स असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम वंगा यांनी दिली आहे. या मुदतवाढीमुळे शहरातील यंत्रमागधारकांना त्याचा निश्चितच फायदा होईल, असे मत वंगा यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विभागाकडून १६ फेब्रुवारीला काढलेल्या आदेशाद्वारे वीज बिल सवलतीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे गरजेचे होते. परंतु या कमी कालावधीत ही क्लिष्ट अर्ज प्रक्रिया पूर्ण होणे अडचणीचे झाल्याने या अनुदान सवलतीपासून अनेक छोटे यंत्रमागधारक वंचित राहणार असल्याच्या भीतीने वंगा, सरचिटणीस मल्लेशम कोंका, विष्णू धावकर यांनी वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख व वस्त्रोद्योग आयुक्त यांच्याकडे मुदतवाढ देण्याबाबत मागणी केली होती. या कमी कालावधीत ऑनलाइन अर्ज करणे शक्य नसल्याने मुदतवाढ मिळावी व २७ अश्वशक्तीपेक्षा कमी भार असणाऱ्या छोट्या यंत्रमागधारकांसाठी ऑफलाइन अर्ज भरण्याची सवलत मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार नुकताच वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रक काढून वीजबिल सवलत मिळण्याकामी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विविध यंत्रमाग संघटनांनी केल्याने १ ते ३१ मेपर्यंत तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांनी आयुक्तालयाच्या https://www.dintexmah.gov.in वेबसाईटवर नोंदणी करण्याची गरज असून या कालावधीत यंत्रमागधारकांनी संकेतस्थळावर नोंदणी करून घ्यावी तसेच २७ अश्वशक्ती पेक्षा कमी यंत्रमाग असणाऱ्या व्यावसायिकांनी संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून तो ऑफलाइन पद्धतीने भरून कार्यालयात जमा करता येणार असल्याची माहिती वंगा यांनी दिली आहे.

Web Title: Extension received for electricity bill subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.