ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तडीपार गुंडाला ठाण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 09:44 PM2018-11-06T21:44:48+5:302018-11-06T21:57:58+5:30
ठाण्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतांनाही तडीपार असलेल्या आपल्याा साथीदाराची तक्रार केल्याच्या रागातून जबीउल्लाह खान या तडीपार गुंडाने एका महिलेला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वागळे इस्टेट पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तडीपार केलेला जबीउल्लाह खान (रा. हाजूरी, वागळे इस्टेट, ठाणे) याला वागळे इस्टेट पोलिसांनी एका धमकी प्रकरणात ४ नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
वागळे इस्टेट हाजूरी दर्गा येथील आफरीन शेख हिने बहादुर मेहरा या तडीपार गुंडाविरुद्ध तक्रार दिल्याचा राग मनात धरुन आफरीन हिच्या घराच्या दरवाजा आणि गॅलरीत वाळत टाकलेल्या कपडयांवर जबीउल्लाह याने रॉकेल ओतून आग लावल्याचा प्रकार २ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वा. च्या सुमारास घडला. आग लावून कपडयांचे नुकसान केल्यानंतर ‘अभी तो घर जलाया, बाद मे दोनो को जान से मार डालूूंगा,’ अशीही त्याने धमकी दिली. याप्रकरणी अफरीनचे पती शहादत यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ३ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केल्यानंतर जबीउल्लाह या तडीपार गुंडाला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्यावर पुन्हा तडीपारीची कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी सांगितले.
------------