खंडणीखोर त्रिकुटाला अटक ; ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई

By अजित मांडके | Published: November 4, 2023 02:55 PM2023-11-04T14:55:59+5:302023-11-04T14:56:34+5:30

परिसरातील नागरीकांकडून कोणी ब्लॅकमेलींग करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्वरीत खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले आहे.

Extortion trio arrested; Action of Thane Anti-Extortion Squad | खंडणीखोर त्रिकुटाला अटक ; ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई

खंडणीखोर त्रिकुटाला अटक ; ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई

ठाणे : माहिती अधिकार कायद्यान्वये मिळविलेल्या माहितीचा गैरवापर करून मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषणास बसून शासकीय अधिकाऱ्याकडे दोन लाख रूपये खंडणीची मागणी करणाऱ्या सुभाष पाटील (४०), समषाद पठाण (४८), संतोष हिरे (४४) अशा तीन जणांच्या टोळीस ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्या त्रिकुटाला येत्या ७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून अशाप्रकारे ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर या परिसरातील नागरीकांकडून कोणी ब्लॅकमेलींग करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्वरीत खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले आहे.

अटकेतील त्रिकुटापैकी नाशिक येथील पाटील हा माहिती अधिकारी कार्यकर्ता आहे. तसेच अंबरनाथ येथ पठाण आणि नाशिकमधील हिरे हे दोघे साप्ताहिकाचे पत्रकार आहेत. त्यांनी कळवा येथील सह दुय्यम निबंधक, वर्ग २ चे अधिकारी तथा तक्रारदार जयंत दामोदर जोपळे यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याबाबतच्या बातम्या वृत्तपत्रात छापू बदनामी करू, तसेच तक्रारदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी याकरीता संबंधीत वरिष्ठ कार्यालयात तक्रारी अर्ज करू अशी धमकी दिली. तसेच तक्रार न करण्यासाठी त्यांच्याकडे २ लाख रूपये खंडणीची मागणी केली. परंतू तक्रारदारांनी त्यास नकार दिल्याने यातील पठाण व हिरे हे खंडणीची रक्कम देण्यासाठी दबाव यावा याकरीता त्यांच्याविरोधात बातम्या छापून मुंबई,आझाद मैदान येथे वेळोवेळी उपोषणास बसुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी करीत होते.

२ नोव्हेंबर २०२३ रोजी जोपळे यांनी खंडणी विरोधी पथक कार्यालयात जाऊन तक्रार केली. त्यानंतर तक्रारदारांकडे मागणी केलेली खंडणीची रक्कम स्वीकारण्याकरीता कळवा, सरोवर हॉटेल येथे हिरे याला ५० हजार तर पठाण याला एक लाख रुपये घेताना वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधात जोपळे यांच्या तक्रारीनुसार कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक केली. तर पाटील याला नाशिक येथून अटक केली. या तिघांच्या विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल नसून त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक या परिसरात अशाप्रकारे खंडणीची मागणी केली असल्याची शक्यता वर्तवित त्यादृष्टीने पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपायुक्त पाटील यांनी दिली.

Web Title: Extortion trio arrested; Action of Thane Anti-Extortion Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.