मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून पाच लाखांची खंडणी उकळणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:57 PM2018-10-26T22:57:43+5:302018-10-26T23:05:24+5:30
शस्त्र परवाना रद्द करण्याची धमकी देत पाच लाखांची खंडणी उकळणा-या संतोष जगताप याला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पोलीस महासंचालक कार्यालयासह मंत्रालयातील अधिका-यांची ओळख असल्याने शस्त्र परवाना रद्द करण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी उकळणा-या संतोष जगताप (रा. वसंतविहार, ठाणे) याला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कुर्ला येथील या तक्रारदाराचा मित्र विनोद यादव याला राज्य शासनाच्या गृहविभागाकडून स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळाला आहे. मंत्रालयीन अधिकारी तसेच पोलीस महासंचालक कार्यालयातील अधिका-यांच्या ओळखीने हा शस्त्र परवाना रद्द करण्याची धमकी जगतापने दिली होती. त्यानंतर, १० आॅक्टोबर रोजी रात्री ९ वा.च्या सुमारास साईकृपा हॉटेल येथे भेटून यादवचा शस्त्र परवाना रद्द न करण्यासाठी त्याने पाच लाखांची मागणी केली. त्यातील दोन लाख रुपये १५ आॅक्टोबर रोजी, तर २४ आॅक्टोबर रोजी तीन लाख रुपये स्वीकारले. दरम्यानच्याच काळात संबंधितांनी ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे संपर्क साधून याबाबतची तक्रार २५ आॅक्टोबर रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. ती दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर तसेच खंडणीविरोधी पथकाचे उपनिरीक्षक कुटे यांनी त्याला तीन लाखांची खंडणी स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.