चाळींच्या जमिनीसाठी झाली विशाल तावरेची हत्या?
By Admin | Published: July 17, 2017 01:18 AM2017-07-17T01:18:29+5:302017-07-17T01:18:29+5:30
कोळेगावातील न्यू बालाजी दर्शन ही चाळ पाडून ती जमीन एका बिल्डरला देण्यात आली होती. त्यासाठीच चाळीचे पाणी तोडण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोळेगावातील न्यू बालाजी दर्शन ही चाळ पाडून ती जमीन एका बिल्डरला देण्यात आली होती. त्यासाठीच चाळीचे पाणी तोडण्यात आले होते. त्रासलेले चाळीतील रहिवासी शरण येतील आणि मिळेल ती रक्कम घेत घरे सोडतील, असा चाळमाफियांचा प्रयत्न होता. पण पाणी तोडल्याचा जाब विचारल्याने, त्यासाठी वेगवेगळ््या विभागात विशाल तावरेने चकरा मारल्याने बिंग फुटेल या भीतीतून आणि बिल्डरच्या दबावातून ही हत्या झाल्याचे चौकशीतून पुढे येत आहे.
पोलिसांसह ज्या ज्या विभागांकडे विशाल यांनी तक्रारी केल्या, त्यांच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात काहीच हालचाल न करण्यामागचे गौडबंगाल काय असाही प्रश्न निर्माण झाला असून त्यातील काहींची या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे.
विशालने न्यू बालाजी दर्शन चाळीत तीन वर्षापूर्वी खोली घेतली होती. चाळीचा पाणी पुरवठा तोडला आणि तो दीड महिन्यानंतरही सुरळीत होत नसल्याने तो कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे गेला. पण तेथे कोणीच त्याकडे लक्ष दिले नाही, अशी माहिती चाळीतील रहिवाशांनी दिली. विशालच्या हत्या प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ पाटील याने एका बिल्डरला चाळीची जागा विकसित करण्यासाठी दिली होती. त्यात दोघांनाही निम्मा हिस्सा मिळणार होता. पण चाळकऱ्यांना हिस्सा देण्याची त्यांची तयारी नव्हती. चाळीशेजारीच पाटीलची १५ गुंठे जागा होती. तीही विकसित करायची होती. पण त्यासाठी पोहोच रस्ता बांधण्यात ही चाळ आड येत होती. चाळीतील रहिवाशांची कोंडी केली, तर ते वाटाघाटी करतील, असा त्यांचा अंदाज होता. त्यासाठी पाणी तोडण्यात आले. पण चर्चेसाठी कोणीही पुढे न येता उलट विशाल हा चाळीतील ४८ जणांच्या पाण्यासाठी भांडू लागल्याने त्यांचा प्रयत्न फसला.
हत्या झाली त्या रात्री त्याने प्रथम विशालचे चुलते धरमदास व चुलत भाऊ अमितला घरी बोलावून घेतले होते. त्यानंतर एका व्यक्तीची गाडी पाठवून विशालचा आणखी एक भाऊ सुभाष याला बोलावले. तो जाण्यास तयार होत नसल्याने त्याला जबरदस्तीने नेण्यात आले. हे कळताच विशाल तेथे गेला. तेथे तोडगा काढण्याऐवजी पाटील यांनी विशालला बेदम मारहाण केली आणि उपचार घेताना विशालचा मृत्यू झाला.
मालक नसतानाही या चाळीचे पाणी तोडण्याचा अधिकार पाटील व संबंधितांना कोणी दिला. ते कनेक्शन कोणी कापले आणि तक्रार करूनही पालिका, पोलिसांनी याची दखल का घेतली नाही, याबाबत सारे गप्प आहेत. सुभाषला जबरदस्तीने उचलून नेल्याबद्दल पोलिसांनी अद्याप अपहरणाचा गुन्हा का दाखल केला नाही, असा प्रश्नही त्याने व तावरे कुटुंबियांनी केला.