डोळ्याला पाणी दिसते मात्र प्यायला मिळत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 11:50 PM2019-06-09T23:50:17+5:302019-06-09T23:50:52+5:30
ग्रामस्थांनी मांडली व्यथा : योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
भातसानगर : शहापूर तालुक्यात अशी अनेक गावे, पाडे आहेत की, ज्या गावपाड्यांतून दूरवर पाणी डोळ्यांना दिसते, मात्र ते प्यायला मिळत नसल्याचे वास्तव आहे. तालुक्यातील पाणीटंचाई केवळ नियोजन नसल्याने पाहायला मिळत आहे. आज ज्या पाणीयोजनांवरील निधी खर्च करूनही पूर्ण झालेल्या नाहीत, अशा कंत्राटदारांकडून खर्च झालेले पैसे वसूल करून केलेल्या कामांची प्रत तपासून पाहिल्यास बराच फरक पडू शकतो.
आज तानसा, वैतरणा या धरण परिसरांत ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे, त्यांना या धरणातून पाणी उचलण्यास परवानगी नाही. तालुक्यातील सर्वच टंचाईग्रस्त गावपाड्यांना भातसा धरणातूनच पाणीपुरवठा केला जात आहे. तानसा धरण परिसरातील अंबतपाडा, टोकरेपाडा, चिंचेचापाड्यात गेल्यास व दूरवर नजर टाकल्यास तानसातील पाणी दिसते. मात्र, ते या गावातील नागरिकांना प्यायला मिळत नाही. तीन टँकरने पाणीपुरवठा होतो, तो तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तानसा धरणातून नाही, तर १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भातसा धरणातून. आज या वाड्यापाड्यांमध्ये विहिरी असूनही एकाही विहिरीला पाणी नसल्याने नागरिक लांबून खड्ड्यांतून पाणी आणत आहेत. अधूनमधून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, मात्र तो पुरेसा नाही. सध्या तालुक्यातील सर्वच गावपाडे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाणीटंचाई पुढील वर्षी जाणवू नये, यासाठी आतापासूनच उपाययोजना होणे गरजेचे आहे.
आज आमच्या पाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत पाऊस पडल्यास ती दूर होईल.
- अविनाश भोईर, ग्रामपंचायत सदस्य
आता पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावपाड्यांची टंचाईपासून सुटका होईल.
- एम.बी. आव्हाड,
उपकार्यकारी अभियंता