भिवंडी आगडोंबाच्या तोंडावर , सरकारी खात्यांची मिलीभगत नागरिकांच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:50 AM2017-12-07T00:50:24+5:302017-12-07T00:50:42+5:30
भिवंडी आणि आसपासच्या गावांना बेकायदा गोदामांनी विळखा घातल्याचे ठाऊक असूनही जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व सरकारी खात्यांनी त्याकडे केलेले सोयीस्कर दुर्लक्ष आता नागरिकांच्या जीवावर उठले आहे.
भिवंडी : भिवंडी आणि आसपासच्या गावांना बेकायदा गोदामांनी विळखा घातल्याचे ठाऊक असूनही जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व सरकारी खात्यांनी त्याकडे केलेले सोयीस्कर दुर्लक्ष आता नागरिकांच्या जीवावर उठले आहे. त्यामुळे भिवंडी शहर आणि आसपासचा परिसर आगीच्या ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते, अशी स्फोटक परिस्थिती येथे असल्याचे बुधवारच्या आगीमुळे स्पष्ट झाले. त्यातून धडा घेऊन यानंतरही जर कारवाई झाली नाही, तर भीषण परिस्थिती उद््भवू शकते, याची चुणूक या घटनेने सर्व सरकारी यंत्रणांना दाखवली आहे.
ओवळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत सकाळी लागलेली आग भडकत गेली, ती आग विझवण्याच्या साधनांचा ्भाव असल्यामुळे. नंतर ती भडकली आणि काही काळ आगडोंब उसळला. त्यात १६ गोदामे खाक झाली. ही येथील पहिली घटना नाही.
वारंवार येथे अशा घटना घडतात, त्यानंतर एकाही खात्याने आजवर त्याकडे लक्ष दिलेले नाही किंवा सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.
ही गोदामे बेकायदा उभारलेली आहेत. त्यातील अनेकांच्या जागाही बिनशेती केलेल्या नाहीत. काही गोदामे बळकावलेल्या सरकारी जमिनीवर आहेत. त्याची सर्व माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे. त्याचा संपूर्ण तपशील त्या कार्यालयाने यापूर्वीच गोळा केला आहे. या गोदामांत साठवलेल्या मालाची अनेकदा नोंद केलेली नसते. त्यामुळे ज्वलनशील वस्तू असतील तरी त्यापासून उद््भवणाºया धोक्यांबाबत कोणालाही फिकीर नसते. आग विझवण्याची साधने नसूनही त्याबद्दल एकही अधिकारी तोंड उघडायला तयार नाही, याचा अर्थ एक तर त्यांचे तोंड बंद केले असावे किंवा त्यांच्यावर या लॉबीची, त्यातील गुंतवणूकदारांची जबरदस्त दहशत असावी, असेच आसपासच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
जेव्हा ओवळीच्या सागर कॉप्लेक्समधील धनराज दासवानी यांच्या मालकीच्या चेक पॉंइंट या कागद, फर्निचरचा साठा असलेल्या कंपनीला सकाळी आग लागली. गोदामांतून निघात असलेल्या धुरामुळे नागरिकांनी पोलीस ठाणे आणि अग्नीशमन दलाला खबर दिली. पण या गोदामाचे शटर उघडत नसल्याने आग धुमसत गेली, भडकली आणि ती आसपासच्या गोदामांत पसरली. या गोदामांत सुमारे २५ कामगार अडकल्याने लोकांची धावपळ सुरू झाली. पण आजूबाजूच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना वेळीच बाहेर काढल्याने प्राणहानी टळली. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोचेपर्यंत पाच गोदामांत आग पसरली होती. त्यातच आग विझवण्यासाठी येणाºया अग्नीशमन दलाच्या गाड्या वाहतूक कोंडीत अडकल्या. एकेक करीत सायंकाळपर्यंत १६ गोदामे आगीत जळून खाक झाली. प्लास्टिक, औषधे व रसायनांची गोदामे जळाल्याने विषारी धूर पसरला. त्यामुळे परिसरातील नागरिक गुदमरले. डोळे चुरचुरणे, खोकला येणे, असा त्रास त्यांना झाला. महामार्गासह शहरात सर्वत्र पसरलेल्या धुरामुळे वाहतूक खोळंबली. नंतर ती संथगतीने सुरू होती.
भिवंडीतील अनधिकृत गोदामांत लागणाºया आगी, त्यांनी बळकावलेली जागा, तेथे बेदायदा साठवलेला माल याबाबत गेली दोन वर्षे उघडपणे चर्चा सुरू असतानाही त्याकडे सरकारी यंत्रणांकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र बुधवारच्या घटनेचा बराच गवगवा झाल्याने आगीत जळालेली गोदामे अधिकृत आहेत का, याची चौकशी आता पोलिसांनी सुरू केली आहे.