फेसबुकवर मुलीचं बनावट खातं उघडून तिच्या मैत्रिणींना अश्लील फोटो, क्लिप पाठवणा-या आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 09:58 PM2018-03-25T21:58:22+5:302018-03-25T21:58:22+5:30
मुलीच्या नावे बनावट फेसबुक खाते उघडून तिच्या मैत्रिणींचा मोबाईल नंबर घेऊन ६ जणींना अश्लील फोटो आदी पाठवणारा आरोपी मंगेश इश्वरदास तांबे (२२) ह्याला उत्तन सागरी पोलीसांनी अहमदनगरच्या राहुरीतील तांबेरे येथून अटक केली आहे.
मीरा रोड - मुलीच्या नावे बनावट फेसबुक खाते उघडून तिच्या मैत्रिणींचा मोबाईल नंबर घेऊन ६ जणींना अश्लील फोटो आदी पाठवणारा आरोपी मंगेश इश्वरदास तांबे (२२) ह्याला उत्तन सागरी पोलीसांनी अहमदनगरच्या राहुरीतील तांबेरे येथून अटक केली आहे.
उत्तन भागातील एका १५ वर्षीय मुलीच्या पालकांकडे अन्य ५ मुलीचे पालक येऊन तुमची मुलगी आमच्या मुलींना फेसबुक, व्हॉट्सएपवर अश्लील मॅसेज, फोटो व क्लिप पाठवत असल्याच्या तक्रारी केल्या. त्यामुळे त्या १५ वर्षीय मुलीच्या पालकांना देखील धक्का बसला. पण आपल्या मुलीने असं काही केलंच नसल्याचे व ते फेसबुक खातं देखील तिचं नसल्याची खात्री झाल्यावर १६ मार्च रोजी मुलींसह पालकांनी उत्तन सागरी पोलीस ठाणे गाठले.
सहाय्यक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे यांनी या प्रकरणी तक्रारीवरून बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण तसेच भादंवि व आयटी कायद्यातील कलमांखाली गुन्हा दाखल केला व पुढील तपास सुरू केला. तपासात पोलिसांना आरोपीची ओळख पटताच उपनिरीक्षक जगदीश बांगरसह किरण ठाकूर, दिनेश आहेर यांनी आरोपी तांबे याला अहमदनगर येथे जाऊन अटक केली. मंगेशला उद्या २६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणी पुढिल तपास भार्इंदरचे निरीक्षक राजेंद्र कांबळे करत आहेत.
मंगेस हा वीटभट्टीवर काम करणारा ९ वी शिकलेला तरुण आहे. त्याने फेसबुक वरुन पिडीत मुलीशी मैत्री केली. नंतर तीचं बनावट खातं उघडुन तीच्या मैत्रीणींशी मॅसेंजर द्वारे चॅटींग करुन त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक मिळवले. मंगेश हा पिडीत मुलीच्या नावाने सदर मुलींना अश्लील फोटो, क्लीप व संदेश पाठवु लागला. पोलीसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असुन तो फॉरेन्सीक लॅब कडे तपासणी साठी पाठवला आहे.