फेसबुकवर केलेली मैत्री जिवावर बेतली, तरुणीची आत्महत्या, बदनामीच्या धमकीने २० लाख उकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 04:39 AM2018-01-02T04:39:42+5:302018-01-02T10:26:30+5:30
फेसबुकच्या माध्यमातून झालेली मैत्री ठाण्यातील एका विद्यार्थिनीच्या जिवावर बेतली. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्राने तिच्याकडून तब्बल २० लाख रुपये उकळले. त्यानंतरही त्रास सुरूच असल्याचे पाहून या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ठाणे - फेसबुकच्या माध्यमातून झालेली मैत्री ठाण्यातील एका विद्यार्थिनीच्या जिवावर बेतली. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्राने तिच्याकडून तब्बल २० लाख रुपये उकळले. त्यानंतरही त्रास सुरूच असल्याचे पाहून या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पालघर येथील रहिवासी असलेली २० वर्षांची विद्यार्थिनी तेथील एका महाविद्यालयामध्ये बीकॉमच्या अंतिम वर्षाला शिकत होती. जवळपास तीन वर्षांपूर्वी मुंब्रा येथील अमृतनगरातील अमीन मन्सुरी (वय २२) याच्याशी तिची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. दोघांची मैत्री लवकरच फुलली. दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. वर्षभरापूर्वी मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रकार समजला. मुलगा आणि मुलगी एकाच धर्माचे, परंतु भिन्न जातींचे आहेत. मुलीच्या कुटुंबीयांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मित्राशी विवाह करण्याची तिची तयारी आहे का, असेही मुलीच्या कुटुंबीयांनी विचारले. त्या वेळी मुलीने लग्नासाठी स्पष्ट नकार दिला. मित्राशी असलेले संबंध आपण पूर्णत: बंद करू, असा शब्द तिने कुटुंबीयांना दिला. कुटुंबीयांनी तिच्या शब्दावर विश्वास ठेवून या प्रकरणावर पडदा टाकला.
दरम्यान, कुटुंबात निर्माण झालेले वादळ काहीसे शमल्यानंतर दोघांच्या भेटीगाठी पुन्हा सुरू झाल्या. अमीनने या मैत्रीच्या संबंधांचा गैरफायदा घेतला. मुलीचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी करण्याची धमकी त्याने दिली. अमीनशी आपले मैत्रीपूर्ण संबंध कायम असल्याचे मुलीने कुटुंबीयांना सांगितले नव्हते. कुटुंबीयांना माहीत पडले, तर ते रागावतील, अशी मुलीला भीती होती. त्यामुळे ती अमीनच्या धमक्यांना बळी पडली. घाबरून तिने आत्महत्या केली. तिच्या मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी आढळली नाही. कुटुंबीयांनी तिच्या काही जवळच्या मैत्रिणींकडे चौकशी केली असता, वस्तुस्थिती समजली. कुटुंबीयांनी रविवारी याप्रकरणी राबोडी पोलिसांकडे तक्रार दिली. अमीन मन्सुरीविरुद्ध खंडणीवसुलीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला. राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी.आर. सोनोने या प्रकरणाचा तपास करत आहेत.
त्रासाला कंटाळून दिला जीव
थोडेथोडे करून अमीनने मुलीजवळून २० लाख रुपये उकळले. अमीनची भूक दिवसेंदिवस वाढतच होती. या त्रासाला कंटाळून तिने २६ डिसेंबरला सायंकाळी ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्स येथील सावत्र आईच्या घरात गळफास घेतला.