समता विचार प्रसारक संस्थेतर्फे प्लाझ्मा आणि कोरोना औषधांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 04:05 AM2021-05-02T04:05:09+5:302021-05-02T04:05:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे शहरातील प्लाझ्मा, बेड आणि रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना समता विचार प्रसारक संस्थेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहरातील प्लाझ्मा, बेड आणि रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना समता विचार प्रसारक संस्थेने पुढाकार घेऊन रुग्णांच्या नातेवाइकांना मदतीचा हात पुढे केला. त्यांना प्लाझ्मा, काेराेनाची औषधे उपलब्ध करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत केली. संस्थेतर्फे ५५ रुग्णांना प्लाझ्मा, १९ रुग्णांना बेड, पाच जणांना रक्तपुरवठा, तीन रुग्णांना ऑक्सिजन, १८ रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात यश आले आहे.
ठाण्यात एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल केला की डॉक्टर उपचार केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांना सांगून रुग्णाला लागणारे प्लाझ्मा, रेमडेसिविर इंजेक्शन, टाॅसिलिझुमॅब इंजेक्शन, रक्त, ऑक्सिजन अशा अनेक आवश्यक साहित्याची जुळवाजुळव करण्यास सांगतात. नातेवाइकांसाठी याची व्यवस्था करणे खूप कठीण जात असल्यामुळे संस्था महिनाभरापासून त्यांना मदत करत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी तत्काळ मदत मिळावी यासाठी संस्थेतर्फे सहखजिनदार आणि जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे ठाणे शहर समन्वयक अजय भोसले यांच्या संयोजनाखाली हे काम सुरू आहे. सध्या प्लाझ्माचा तुटवडा व रक्तपुरवठा पेढीवरील ताण बघता संस्थेतर्फे ताे कमी करण्यावर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मादान करण्यासाठी आवाहन करत आहाेत. प्लाझ्मा मागण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांची संख्या माेठी आहे. अनेकदा त्यांनाच प्लाझ्मादाता शाेधावा लागताे. प्लाझ्मादान करणाऱ्या नागरिकांची अँटिबॉडीज आणि एचबी व अन्य चाचण्या रक्तपेढ्यांत केल्या जातात, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा मनीषा जोशी यांनी दिली. काही जणांना मदत करता न आल्यामुळे प्राण गमवावे लागले. त्यामुळे जास्तीत जास्त प्लाझ्मादात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. सर्व कोरोनामुक्त रुग्णांनी सामाजिक जबाबदारी व कर्तव्य समजून प्लाझ्मादान करून रुग्णांचा जीव वाचवण्यास मदत करावी, असे आवाहन संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी केले आहे.