फ्युनिक्युलर रेल्वेचे श्रेय राष्ट्रवादीचेच

By admin | Published: April 29, 2017 01:28 AM2017-04-29T01:28:43+5:302017-04-29T01:28:55+5:30

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावरील फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पाचे सर्व श्रेय खरेतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. २००८ मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला.

The fact of the funicular train is the credit of NCP | फ्युनिक्युलर रेल्वेचे श्रेय राष्ट्रवादीचेच

फ्युनिक्युलर रेल्वेचे श्रेय राष्ट्रवादीचेच

Next

डोंबिवली : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावरील फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पाचे सर्व श्रेय खरेतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. २००८ मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला. त्यासाठी कोट्यवधींचा निधी मिळाला, तेव्हा त्यास सुरुवात झाली. त्यावेळी किसन कथोरे हे आमच्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात या महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली, हेच वास्तव आहे. पण, न केलेल्या कामांचे श्रेय घेण्याची शिवसेनेची सवय जुनीच आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी केला आहे.
परांजपे म्हणाले की, फ्युनिक्युलर रेल्वेसाठी कथोरे यांनीच नऊ वर्षे पाठपुरावा केला. त्यामुळे आता निदान प्रकल्प पूर्णत्वास जाताना तरी दिसत आहे. अन्यथा, अनेक गोष्टी जशा कागदावर आहेत, तसेच झाले असते, असा टोलाही त्यांनी खासदार डॉ. शिंदे यांना लगावला.
मलंगगडावरील फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प काही महिन्यांत पूर्ण होणार असल्याचे ‘लोकमत’मधील वृत्तांमुळे समजले आणि समाधान वाटल्याचे ते म्हणाले. हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी कथोरे यांच्या प्रकल्पाला तातडीने मंजुरी देत कामाला लागण्याचे आदेश दिले होते, हे सर्वश्रुत आहे. त्यानंतरच्या काळात त्याचा शुभारंभ झाला. कामही सुरूही झाले. मात्र, त्यादरम्यान कथोरे यांचा मतदारसंघ बदलला गेला. पण, त्यानंतर अंबरनाथ मतदारसंघातील शिवसेनेच्या आमदारांनी या प्रकल्पात लक्ष का घातले नाही, याबाबतची त्यांना काहीच माहिती नव्हती. कथोरे यांनी यासाठी कसा आणि कुठून निधी आणला, ही सर्व पार्श्वभूमी तरी खासदार शिंदे यांना माहीत आहे का? विकासकामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कधीही मागेपुढे बघत नाही. ना प्रकल्प मंजुरीसाठी अडकवून ठेवत, त्यातील हे उदाहरण आहे, असे परांजपे म्हणाले.
माझ्या खासदारकीच्या काळात मी ठाकुर्लीचा उड्डाणपूल, माणकोलीचा पूल असो, हे मंजूर करून घेतले होते. याची माहिती शिंदे यांना आहे, पण त्यासाठी सगळ्यांना विश्वासात घेत पुढे जाण्याचे औदार्य ते दाखवणार नाहीत, हे देखील सगळ्यांना माहीत आहे. ठाकुर्ली स्थानकाचा कायापालट आणि दिवा स्थानकाचे रूपडे पालटणार, हे देखील माझ्याच कारकिर्दीत मी रेल्वे बोर्डासह एमआरव्हीसीकडून मंजूर करवून आणले होते. खासदारांसाठी काम करणारे ज्येष्ठ शिवसैनिक या सगळ्यांचे साक्षीदार आहेत. ते याबाबत माझ्याविरोधात भाष्यच करू शकणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
कल्याण-डोंबिवलीसह अन्य ठिकाणी सुरू असलेले प्रकल्प निश्चितच आघाडी सरकारच्या काळात सुरू झाले आहेत. तोच रेटा हे पुढे नेत आहेत. यांनी केलेली कामे सांगावीत. यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले प्रकल्प आणि तडीस गेलेले प्रकल्प यांनी सांगावेत, असे खुले आव्हानही परांजपे यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: The fact of the funicular train is the credit of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.