राजकारणी संमेलनाध्यक्ष ठरवतात यात तथ्य
By admin | Published: November 6, 2016 04:14 AM2016-11-06T04:14:29+5:302016-11-06T04:14:29+5:30
राजकारणी संमेलनाध्यक्ष ठरवतात हे आरोप निराधार नाहीत. त्यात काही अंशी तथ्य आहे, अशी भूमिका साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या रिंगणातील उमेदवार मदन
- जान्हवी मोर्ये, डोंबिवली
राजकारणी संमेलनाध्यक्ष ठरवतात हे आरोप निराधार नाहीत. त्यात काही अंशी तथ्य आहे, अशी भूमिका साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या रिंगणातील उमेदवार मदन कुलकर्णी यांनी घेतली. अन्य उमेदवार जयप्रकाश घुमटकर आणि त्यांचे सूचक अशोक बागवे यांनी आधी हा आरोप केला होता. घुमटकर यांना असा अनुभव आला असेल म्हणून त्यांनी आरोप केला असेल, असेही कुलकर्णी म्हणाले. अन्य उमेदवार प्रवीण दवणे आणि अक्षयकुमार काळे यांनी मात्र या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
साहित्य संमेलन पूर्वीही शेटजी-भटजींचे होते, ते आजही तसेच असल्याच्या आरोपाबद्दल विचारता कुलकर्णी यांनी साहित्य संमेलनाला जातीय रंग दिला जाऊ नये, असे मत मांडले. मी सुद्धा ब्राह्मण आहे. पण मी कधीही जातीपातीचे राजकारण केलेले नाही. साहित्यात विविध जातीचे लोक आहेत. तेही लिहितात. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरसुद्धा ते ब्राह्मण असल्याची टीका केली जाते. त्याच्या तुलनेत आमचे पद अगदीच किरकोळ आहे, असे सांगत त्यांनी जातीय रंग देण्याच्या प्रयत्नांचा समाचार घेतला.
गांधी प्रतिष्ठानचे गिरीश गांधी यांनी निवडणुपकीपूर्वीच अक्षयकुमार काळे यांना समर्थन दिले. निवडणुकीचे अर्ज भरण्यापूर्वी असे राजकारण सुरू झाल्याने मी मराठवाड्यात मी प्रचार करणार नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. प्रवीण दवणे व अक्षयकुमार काळे यांनी मात्र अध्यक्षपदाची निवडणूक निकोप व्हावी, तिला जातीय रंग देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
साहित्य महामंडळात विशिष्ट लोकांची मक्तेदारी आहे. ठेकेदार आणि मध्यस्थ असे स्वरूप महामंडळाला आले आहे. त्यातूनच मक्तेदारीचा आरोप होतो. घुमटकर यांच्या याबाबतच्या आरोपात त्यांना आलेला अनुभव असेल. तो नाकारता येणार नाही. मी नागपूर भागाकडील असल्याने महामंडळाच्या राजकारणाशी मी परिचित आहे. इतकेच काय, मी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा अक्षयकुमार काळे यांनी मला माघार घेण्यासाठी फोन केला होता. पण मी माघार घेतलेली नाही, असे सांगत कुलकर्णी यांनी महामंडळाच्या राजकारणाबाबत भूमिका मांडली.
या निवडणुकीत आतापर्यंत घुमटकर यांनीच साहित्य महामंडळ, अध्यक्ष निवड आणि संमेलनावरील शेटजी-भटजींची छाप हे मुद्दे चर्चेत आणले आहेत.
प्रगल्भता, परिपक्वता दाखवा : दवणे
दवणे यांनी मात्र साहित्य महामंडळात कोणताही भेदभाव नसल्याचे मत मांडले. प्रचारासाठी मी फिरतो आहे. मला असा कोणताही अनुभव आलेला नाही. सर्व मंडळी अभ्यासू आहेत. सगळे साहित्यिक चांगले आहेत. साहित्यात सर्व प्रकारचे प्रवाह आहेत. ते त्यांचे त्यांचे विचार मांडतात. त्यात मक्तेदारीचा विषय उपस्थिती करणे मला तरी योग्य वाटत नाही.
सध्याची संमेलने सगळ््या प्रवाहांना सामावून घेणारी होत आहेत. अध्यक्षपदासाठी जो साहित्यिक उभा राहतो. तो प्रगल्भ व परिपक्व असतो. त्याने कोणतेही वक्तव्य जबाबदारीपूर्वक करावे. त्याचे भान बहुधा घुमटकर यांना राहिले नसावे, असे मत दवणे यांनी घुमटकर व बागवे यांचा उल्लेख न करता मांडले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्य संमेलनाला साहित्यप्रेमी हजेरी लावतात. त्याला शेटजी व भटजींचे संमेलन म्हणून हिणवणे हे साहित्यप्रेमींचा अवमान केल्यासारखे होईल, अशी भूमिकाही त्यांनी घेतली.
संमेलन शेटजी-भटजींचे नव्हे : काळे
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिल्यावर अशा प्रकारची कोणतीही प्रतिक्रिया व मत व्यक्त करायचे नाही, असे माझे दोरण ठरल्याचे काळे यांनी स्पष्ट केले आणि आरोप-प्रत्यारोप, वादग्रस्त मुद्द्यांवर भूमिका घेण्यास नकार दिला. साहित्य संमेलनाच्या निवडणुकीचा एक अलिखित संकेत आपण पाळला पाहिजे.
स्पर्धा जरूर व्वाही, पण अध्यक्षपदाची निवडणूक निकोपपणे पार पडली पाहिजे, असे ते म्हणाले. सााहित्य महामंडळात मक्तेदारी आहे, असे मला तरी वाटत नाही. संमेलनाला महाराष्ट्रातून इतके लोक येतात. त्यामुळे मला तरी संमेलन शेटजी- भटजींचे आहे, असे वाटत नाही. तसे वक्तव्य संमेलनाला येणाऱ्या विविध जातीपातींच्या समूहावर अविश्वास दाखविण्यासारखे आहे, असे काळे यांनी स्पष्ट केले.