भिवंडीतील यंत्रमाग व्यापाऱ्यांमध्ये दुफळी, बंद पुकारूनही शहरातील यंत्रमाग व्यवसाय सुरूच
By नितीन पंडित | Published: November 1, 2023 06:37 PM2023-11-01T18:37:41+5:302023-11-01T18:38:03+5:30
यंत्रमाग व्यवसायाकडे शासनाचे लक्ष जावे या मागणीसाठी शहरात यंत्रमाग व्यावसायिकांनी १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर असा वीस दिवसांचा बंद पुकारला आहे.
भिवंडी: कापड व्यवसायात आलेली प्रचंड मंदी,वीज दरवाढ,यार्न मधील काळा बाजार या आव अशा अनेक कारणांमुळे डबघाईला आलेल्या यंत्रमाग व्यवसायाकडे शासनाचे लक्ष जावे या मागणीसाठी शहरात यंत्रमाग व्यावसायिकांनी १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर असा वीस दिवसांचा बंद पुकारला आहे. मात्र बंदच्या पहिल्याच दिवशी शहरातील अनेक यंत्रमाग सुरूच होते, त्यामुळे शहरातील यंत्रमाग व्यापाऱ्यांमध्ये दुफळी दिसली. दुसरीकडे यंत्रमाग मालकांनी आपल्या कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता आणि त्याच्या उपजीविकेची कोणतीही तजवीज न करता अचानकपणे आपापले यंत्रमाग वीस दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने व्यापाऱ्यांच्या या निर्णया विरोधात सिटू संलग्न लालबावटा पॉवरलूम वारपर व असंघटित कामगार संघटनेच्या वतीने बुधवारी प्रांत कार्यालयात निवेदन देऊन आपला संताप व्यक्त केला आहे.
भिवंडीत सुमारे सात लाखां पेक्षा जास्त पावरलूम असून ऐन दिवाळीच्या काळात यंत्रमाग मालकांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कामगारां मध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यंत्रमाग मालकांनी घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात पॉवरलूम वारपर व असंघटित कामगार संघटना लालबावटा युनियनचे अध्यक्ष कॉ.सुनील चव्हाण यांनी कठोर भूमिका घेत शासनाकडे कामगाराची भूमिका मांडण्यासाठी भिवंडी प्रांत कार्यालया मध्ये निवेदन दिले.हे निवेदन प्रांतांच्या गैरहजेरीत नायब तहसीलदार चंद्रकांत राजपूत यांनी स्वीकारले.
यंत्रमाग कारखाने बंद करण्या पूर्वी मालकांनी सर्व कामगारांना एक महिन्याचा पगार भरून दिला पाहिजे.कामगारांना गावी जाण्यासाठी अतिरिक्त गाड्यांची सोय झाली पाहिजे, गावी जाणार नसलेल्या कामगारांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था मालकांनी केली पाहिजे.कामगार कायद्यानुसार कामगारांना सुविधा न देणाऱ्या यंत्रमाग कारखाना मालकांना मिळणाऱ्या सरकारी सवलती आणि वीजदरात सवलत बंद करावी. शासकीय नियमानुसार यंत्रमाग कारखाना बाहेर नोंदणीकृत आस्थापनाचे दर्शनी भागात फलक लावून त्यामध्ये कारखाना मालकांचे नाव,कामगारांची संख्या आणि आस्थापनाचा संपूर्ण पत्ता नमूद करावा.
यंत्रमाग मालकांना कारखान्यातील कामगारांना कामगार कायद्यानुसार सोयी,सुविधा आणि सवलती देण्यास भाग पाडा,आशा कामगारांच्या मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयात लालबावटा संघटनेचे स्थानिक अध्यक्ष कॉ. सुनील चव्हाण यांनी दिले आहे.या मागण्यासाठी यंत्रमाग मालकांच्या संघटनांशी चर्चा करून या मागण्या पूर्ण केल्यास मालकांच्या यंत्रमाग बंद आंदोलनास कामगारांचा पाठिंबा राहील अन्यथा कामगारांचे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा कोम्रेड सुनील चव्हाण यांनी दिली आहे..