सरवली एमआयडीसी परिसरातील कारखाने जलप्रदूषणास जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 01:01 AM2019-11-27T01:01:52+5:302019-11-27T01:02:10+5:30
केडीएमसीचे आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपल्याने त्यातील कचरा कल्याण खाडीतील पाण्यात मिसळत आहे. मात्र, यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाला डम्पिंगऐवजी सरवली एमआयडीसीच खरी जबाबदार आहे.
कल्याण - केडीएमसीचे आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपल्याने त्यातील कचरा कल्याण खाडीतील पाण्यात मिसळत आहे. मात्र, यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाला डम्पिंगऐवजी सरवली एमआयडीसीच खरी जबाबदार आहे. तेथील रासायनिक कारखान्यांतून रसायनमिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करताच खाडीत सोडले जात आहे, असा आरोप केडीएमसीचे स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. खाडी प्रदूषित करणाºया कारखान्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण येथील कार्यालयाकडे त्यांनी केली आहे.
‘कचºयामुळे होतेय जलप्रदूषण’ या मथळ्याखाली वृत्त ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये २६ नोव्हेंबरला प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत म्हात्रे म्हणाले, डम्पिंगच्या कचºयापेक्षा कोन गावाच्या दिशेने सरवली एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांतून सोडण्यात येणाºया रसायनमिश्रित पाण्यामुळे खाडी जास्त प्रदूषित होत आहे. त्यामुळे खाडीच्या पाण्याला दुर्गंधी येते. खाडीतील जैवविविधताही धोक्यात आली आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या प्रदूषणाकडे डोळेझाक केली जात आहे.
म्हात्रे पुढे म्हणाले, डोंबिवलीतील प्रदूषणाच्या प्रश्नाकडेही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष नाही. डोंबिवली एमआयडीसीत फेज १ व २ मध्ये दोन सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (सीईटी) कार्यरत आहेत. असे असूनही प्रदूषणाच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. प्रदूषण रोखण्याऐवजी सरकारी संस्था एकमेकांविरोधात आरोपप्रत्यारोप करत आहेत. सरवली एमआयडीसीत सीईटी नाही. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयातील प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे मी तक्रार केली आहे. त्याची दखल घेत त्यांनी बुधवारी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
आरोपांत तथ्य नाही
कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी म्हणाले, सरवली एमआयडीसीत रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी केंद्र नाही. मात्र, प्रत्येक कारखान्याने सांडपाणी प्रक्रियेची व्यवस्था कारखान्याच्या आवारात करून त्यावर प्रक्रिया करून ते सोडले पाहिजे.
त्यानुसार कारखानदार त्यांच्या आवारात स्वत:च्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून सोडत आहेत. त्यामुळे सरवली एमआयडीतीली रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रियाच केली जात नाही. ते थेट प्रक्रिया न करता खाडीत सोडले जाते, या आरोपात मला तरी तथ्य वाटत नाही.
प्रदूषण नियंत्रण मंडळ व हरित लवाद आहे. त्यामुळे कोणताही कारखानदार अशा प्रकारचे प्रदूषण करण्यास धजावणार नाही, असे मला तरी वाटते, असे सोनी म्हणाले.