फडणवीसांनी मारले एका दगडात तीन पक्षी; शिंंदेंची हवा काढली
By संदीप प्रधान | Published: April 7, 2024 11:36 AM2024-04-07T11:36:48+5:302024-04-07T11:37:45+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेळीतील हवा काढली : सरकारचा रिमोट कंट्रोल आपल्याकडे असल्याचा दिला संदेश
संदीप प्रधान
ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून एका दगडात तीन पक्षी मारले. ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडायचा नाही, म्हणून आपल्या पुत्राचा कल्याण मतदारसंघ जाहीर करायचा नाही, अशी खेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेळली होती. त्यामुळे न सुटणारा तिढा कल्याणचा उमेदवार जाहीर करून फडणवीस यांनी शनिवारी संपविला.
आता ठाणे मतदारसंघ राखण्याची कसरत शिंदे यांना करावी लागेल. कल्याण पूर्वेतील भाजपचे जे पदाधिकारी शिंदे यांचा प्रचार करणार नसल्याचे इशारे देत होते, त्यांना फटकारले. सध्या शिंदेसेनेत अस्वस्थ असलेल्या आमदार, पदाधिकारी यांना राज्यातील सरकारचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती असल्याचा संदेश फडणवीस यांनी दिला. भाजपवर दबाव वाढविण्याकरिता शिंदे यांनी कल्याण मतदारसंघातील उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर केली नाही. ठाणे सुटत नाही, तोपर्यंत कल्याण जाहीर न करता भाजपवर दबाव वाढवायचा हीच त्यांची खेळी होती. यातून आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल, असा शिंदे यांचा कयास होता. फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील, असे जाहीर करून ठाणे मतदारसंघावरील भाजपचा दावा प्रबळ केला.
कल्याण पूर्वेत भाजप व शिंदेसेनेत प्रचंड संघर्ष सुरू होता. याच संघर्षातून आ. गणपत गायकवाड यांनी शिंदेसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे तेथे भाजप-शिंदेसेनेतून विस्तव जात नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलावलेल्या झूम मिटिंगवर कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्त्यांनी बहिष्कार घातला. शुक्रवारी सायंकाळी बैठक घेऊन शिंदे यांचे काम करणार नसल्याचा इशारा दिला व भाजपने कल्याण लोकसभा लढवावी, असा आग्रह धरला. फडणवीस यांनी शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून स्वपक्षाच्या कल्याण पूर्वेतील नाराजांना थेट संदेश दिला.
बंदाेबस्त करा
कल्याण : महायुतीचे वातावरण बिघडवणाऱ्यांचा भाजपच्या वरिष्ठांनी बंदोबस्त करावा.
आमदार गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केले ते निश्चितच चुकीचे आहे. त्यांचे समर्थक असा कांगावा करून युतीमध्ये घोळ घालतील व त्यामुळे गणपत गायकवाड यांना जामीन मिळेल, अशा भ्रमात त्यांनी राहू नये, असा इशारा शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिला.
गद्दार, खोके म्हणायचं
हे सहन करणार नाही
गद्दार, खोके म्हणायचं हे सहन करणार नाही. आमची तीन-तीन पिढ्यांची श्रीमंती आहे. आम्हाला कोणाच्या पैशांची गरज नाही. खरे शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत. शिवसेना ही मराठी माणसाचा अभिमान आहे. आमचा पक्ष चोरला हे उगाच सांगता. उलट तुम्हीच तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला.
- दीपक केसरकर,
शालेय शिक्षण मंत्री