माहिती देण्यास टाळाटाळ, महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 03:50 PM2021-09-16T15:50:12+5:302021-09-16T15:50:40+5:30
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या कडे प्रथम अपील केले असताना म्हसाळ यांनी सुनावणीच घेतली नाही. अपील आपणास मिळालेच नाही असा म्हसाळ यांचा कांगावा सुद्धा माहिती आयुक्तांनी फेटाळून लावला
मीरारोड - माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ करत दिशाभूल करणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्यावर शिस्तभंगाची तर जनमाहिती अधिकारी अविनाश जाधव यांच्यावर ५ हजारांची शास्तीची कारवाई कोकण खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त के. एल. बिष्णोई यांनी केली आहे.
माहिती अधिकारातील अर्जदार कृष्णा गुप्ता यांनी त्यांच्या २०१७ मधील तक्रार अर्जाबाबत २०१८ सालात माहिती माहिती मागवली होती. मीरा भाईंदर महापालिकेतील जनमाहिती अधिकारी अविनाश जाधव यांनी आवश्यक माहिती देण्यास टाळाटाळ चालवली होती. तसेच माहिती आयुक्तांनी नोटीस व आदेश बजावून सुद्धा ते आपणास मिळालेच नाहीत असा जाधव यांचा कांगावा सुद्धा फेटाळून लावला.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या कडे प्रथम अपील केले असताना म्हसाळ यांनी सुनावणीच घेतली नाही. अपील आपणास मिळालेच नाही असा म्हसाळ यांचा कांगावा सुद्धा माहिती आयुक्तांनी फेटाळून लावला. जाधव यांना ५ हजारांचा दंड ठोठावत तो त्यांच्या पालिका वेतनातून कपात करून घ्यायचा आहे. तर कायद्याने दिलेल्या जबाबदारीत कुचराई केली म्हणून म्हसाळ यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश माहिती आयुक्तांनी दिले आहेत. ऑगस्ट मध्ये दिलेले आदेश संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले असून मीरा भाईंदर महापालिकेतील या दोन बड्या अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईचे विविध स्तरावर स्वागत होत आहे.