सावधान...! तुम्ही खाता ते जिरे बनावट तर नाही ना? भिवंडीत सात लाखांचे बनावट जिरे जप्त; दोघांना अटक
By नितीन पंडित | Published: January 26, 2024 03:50 PM2024-01-26T15:50:55+5:302024-01-26T15:52:33+5:30
हॉटेल व धाब्यांवार खाल्ला जाणाऱ्या जीरा राईस मध्ये या जिर्याचा सर्रास वापर केला जात होता.
भिवंडी: शहरात बनावट जिरे विक्री करण्यासाठी आलेल्या टेम्पोवर शांतीनगर पोलिसांनी धाड टाकून ७ लाख १९ हजार ७०० रुपये किमतीचा २३९९ किलो बनावट जिरे शांतीनगर पोलिसांनी जप्त केले आहे.या प्रकरणी दोन जणांना अटक केले असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.शादाब इस्लाम खान वय ३३ वर्ष रा. नवलीफाटा पालघर व चेतन रमेशभाई गांधी वय ३४ वर्ष रा. कांदिवली पश्चिम असे बनावट जिरे प्रकरणी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.
शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ९० फूट रोड, नागाव फातमा नगर येथे बनावट जिरे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक एस एम घुगे व पोलीस शिपाई क्षीरसागर यांना मिळाली होती. शांतीनगर पोलिसांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून नागाव फातमानगर येथे सापळा लावला असता या ठिकाणी पिकअप टेम्पोत बनावट जीरा आढळला पोलिसांनी टेम्पोतून आणलेल्या ८० गोन्यांमधील ७ लाख १९ हजार ७०० रुपये किंमतीचा मधून सुमारे साडेतीन टन बनावट जिरे माल व ४ लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल शांतीनगर पोलिसांनी जप्त केला आहे.
आरोपी चेतन गांधी याने मे.जागृती इंटरप्राईजेस नोबेल इंडस्ट्रियल इस्टेट मनोर जि.पालघर या ठिकाणी शासनाची परवानगी न घेता बनावट जिऱ्याची फॅक्टरी उघडली होती.बडीशेपचा टाकाऊ हिस्सा व लाकूड यात केमिकल व केमिकल मिश्रित पावडरचा वापर करून हा जीरा बनविण्यात येत होता.यासाठी कच्चामाल गुजरात येथील उंजा येथून येत होता.त्यांनतर जीरा बनवून तो बाजार भावाच्या अर्ध्या किंमतीत विकला जात होता.आरोपींनी मागील सहा महिन्यांहून अधिक काळापासून हा बनावट जिऱ्याचा व्यावसाय सुरु केला असून बनावट जीरा वाशी नवी मुंबई एपीएमसी मार्केट, भिवंडी, ठाणे व आजूबाजूच्या परिसरात तसेच हॉटेल व धाब्यांवर विक्री केला जात होता. हॉटेल व धाब्यांवार खाल्ला जाणाऱ्या जीरा राईस मध्ये या जिर्याचा सर्रास वापर केला जात होता.
शांतीनगर पोलिसांनी पालघर येथील बनावट जिरा फॅक्टरी सील बंद केले असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता २७ जानेवारी पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
सदर कारवाई शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे,पोलीस नाईक किरण जाधव, श्रीकांत पाटील,पोलीस शिपाई नरसिंग क्षीरसागर, रवी पाटील, तौफिक शिकलगार यांच्या पथकासह अन्न सुरक्षा अधिकारी इंद्रजीत चिलवंते यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.