बनावट डेबिट, क्रेडिट कार्ड बनवून पैशांचा अपहार ; चौघांना अटक : तीन परदेशी नागरिकांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:29 AM2018-02-28T01:29:36+5:302018-02-28T01:29:36+5:30
आरोपींमध्ये तीन परदेशी नागरिकांचा समावेश असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मीरा रोड : बोगस स्वाईप मशीनद्वारे ख-या क्रेडीट तसेच डेबिट कार्डाचे तपशील मिळवून बनावट कार्डद्वारे एटीएममधून पैशांचा अपहार करणा-या चौकडीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या काशिमिरा शाखेच्या पथकाने २४ फेब्रुवारी रोजी मीरारोड येथून अटक केली आहे. आरोपींमध्ये तीन परदेशी नागरिकांचा समावेश असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मीरा-भार्इंदर परिसरात काही दिवसांपासून ख-या वाटणा-या बोगस स्वाईप मशीनद्वारे ग्राहकांच्या क्रेडिट तसेच डेबिट कार्डच्या तपशीलानुसार बनावट डेबिट आणि क्रेडिट कार्ड बनवून ग्राहकांच्या खात्यातील रकमेचा अपहार होत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या काशिमिरा शाखेला मिळाली होती. त्याचा मागोवा घेण्यासाठी विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आणि शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद बडख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत कारंडे यांच्या पथकाने मीरारोड येथील हॉटेल शुभम येथे २४ फेब्रुवारीला धाड टाकली. त्यावेळी या गोरखधंद्यात समावेश असलेल्या कमाल उस्मान खानसह रिचर्ड रोनाल्ड मागो (नायजेरिया), हिलरी स्थर केगन (केनिया) व सॅन्ड्रीक सॅम डांबा (युगांडा) या चौकडीला पथकाने अटक केली. तसेच त्यांच्याजवळील सुमारे २ लाखांची रोकड आणि लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतला.
पोलिसांनी आरोपींची अधिक चौकशी केली असता ते बोगस स्वाईप मशिन काही दुकानदारांशी संगनमत करुन विक्रीच्या ठिकाणी ठेवत. दुकानदार, ग्राहकांना प्राधान्याने त्या मशीनद्वारे डेबिट किंवा क्रेडीट कार्ड स्वाईप करण्यास सांगत. ग्राहकांनी कार्ड स्वाईप केल्यानंतर खरेदी वा व्यवहाराची रक्कम आणि पिन टाईप केल्यानंतर त्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड (एरर) दाखविला जात असे. दरम्यान त्या स्वाईप मशिनमध्ये ग्राहकांच्या कार्डसह पिन क्रमांकाच्या तपशीलाची नोंद होत असे. त्याद्वारेच या रकमांचा अपहार होत होता.
मोठ्या रॅकेटची शक्यता-
हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवून आरोपींनी मीरा-भार्इंदरसह वसई-विरार व नवी मुंबईतही असे प्रकार केल्याचे समोर आल्याचे कारंडे यांनी सांगितले. याप्रकरणी आरोपींवर मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.