बांधकाम व्यावसायिकाकडून ५ लाख ६० हजारांची खंडणी उकळणारा तोतया फॉरेस्ट अधिकारी जेरबंद
By जितेंद्र कालेकर | Published: April 26, 2024 08:19 PM2024-04-26T20:19:14+5:302024-04-26T20:19:39+5:30
ठाणे गुन्हे शाखेच्या एसटीएफची कारवाई: डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा
ठाणे: शीळ डायघर भागातील अनधिकृत बांधकामाची वारंवार तक्रार करुन त्याची तडजोड करण्यासाठी सात लाख ६० हजारांची मागणी करुन पाच लाख ६० हजारांची रक्कम उकळणाºया प्रसादकुमार उत्तम भालेराव (३३, रा. डायघर, ठाणे) या तोतया वन अधिकाऱ्याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष कृती दलाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी शुक्रवारी दिली. त्याच्याकडून खंडणीतील पाच लाख ६० हजारांची रोकड आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती देतांना उपायुक्त पाटील यांनी सांगितले की, तक्रारदार नफीस सिद्धीकी ( रा. मुंब्रा, ठाणे) यांचा डायष्घर भागात बांधकाम व्यवसाय आहे. ही बांधकामे अनधिकृत असल्याचा दावा करुन आरोपी प्रसादकुमार याने नफीस यांच्यासह शीळ डायघर परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना आपण फॉरेस्ट अधिकारी असल्याचा दावा करीत त्यांच्या बांधकामांविरुद्ध फॉरेस्ट कार्यालयात तक्रार करण्याची धमकी दिली. त्यानंतर माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करून नफीस यांच्यासह इतर बांधकाम व्यवसायिक यांच्याकडून वेळोवेळी पैसे वसूल केले. त्याने फॉरेस्ट कार्यालयांसह इतर कार्यालयात केलेल्या तकारी मागे घेण्यासाठी वन टाईम सेटलमेंटसाठी नफीस यांच्यासह इतर बांधकाम व्यावसायिकांकडून २३ एप्रिल २०२४ रोजी सात लाख ६० हजारांच्या खंडणीची मागणी केली होती.
याबाबतची तक्रार आल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष कृती दलाचे सहायक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पकाच्या पोलिस निरीक्षक वनिता पाटील, सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, भूषण कापडणीस, सुनिल तारमळे आणि उपनिरीक्षक विजयकुमार राठोड आदींच्या पकाने सापळा रचून पाच लाख ६० हजारांची रोकड स्वीकारतांना २५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शीळ गावातील दोस्ती बिल्डींग भागात रंगेहाथ पकडले. आरोपी प्रसादकुमार याच्याकडून खंडणीची स्वीकारलेल्या रक्कमेसह तीन् मोबाईल फोन जप्त केले आहेत. याप्रकरणी शीळ डायघर पोलिस ठाण्यात २६ एप्रिल २०२४ रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.