बनावट सोन्याची विक्री, आणखी तिघांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:35 AM2019-11-06T00:35:42+5:302019-11-06T00:35:54+5:30
दोन गुन्हे होणार दाखल : पोलिसांची माहिती
ठाणे : बनावट सोने विक्री करून त्याद्वारे ४० हजारांची फसवणूक करणाऱ्या जगदीश अडसुळे (२०, रा. आझादनगर, ठाणे) याने नवी मुुंबईतील ऐरोली, रबाले आणि ठाण्यातील कापूरबावडी भागातही असेच फसवणुकीचे प्रकार केल्याचे नौपाडा पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी आता रबाले आणि कापूरबावडी या दोन पोलीस ठाण्यांमध्येही त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आई आजारी असल्याचा बहाणा करून ठाण्यातील सिद्धेश्वर तलावाजवळील संदेश सांगळे (२४) यांच्याकडे अडसुळे याने बनावट सोनसाखळी दिली. त्याबदल्यात त्यांच्याकडून ४० हजारांची रोकड त्याने घेतली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात सांगळे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, उपनिरीक्षक विनोद लबडे आदींच्या पथकाने ४ नोव्हेंबर रोजी त्याला अटक केली. त्याने अशाच प्रकारे १५ दिवसांपूर्वी मावस भावाच्या मदतीने रबाले येथील एका सराफाकडेही बनावट दागिने सोपवून त्याला ७३ हजारांचा गंडा घातला. तर दहा दिवसांपूर्वी ऐरोली येथील एकाला आई आजारी असल्याचे सांगून ६० हजारांची अशाच प्रकारे फसवणूक केली. याशिवाय, एक महिन्यापूर्वी कापूरबावडी भागातील एका रहिवाशालाही असाच बहाणा करून त्यालाही बनावट सोन्याचे दागिने देऊन ४० हजारांची फसवणूक केल्याची कबूलीही त्याने दिली.