कल्याण आरटीओचे बनावट पेज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 12:10 AM2019-11-07T00:10:01+5:302019-11-07T00:10:08+5:30
अधिकाऱ्यांकडून गंभीर दखल : सतर्क राहण्याचे आवाहन
डोंबिवली : गुगलवर ‘आरटीओ कल्याण’ या नावाने बनावट पेज तयार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांंच्या निदर्शनास आली आहे. त्यांनी जाहीर पत्रकाद्वारे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून यासंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ससाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट पेजद्वारे ९३३०६६९७८५ या खोट्या क्रमांकावरून एका अर्जदाराची २२ हजार ७९८ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. २२ आॅक्टोबर रोजी त्यांच्या आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लागलीच खडकपाडा पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आणली. या माहितीद्वारे ससाणे यांनी असा कुठलाही मोबाइल क्रमांक आरटीओकडून प्रदर्शित करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट केले. आॅनलाइन कामासाठी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.परिवहन.जीओव्ही.इन ही अधिकृत वेबसाइट असून फक्त याद्वारेच सर्व प्रकारचे अर्ज, शासकीय फी व कर स्वीकारले जात असल्याचेही स्पष्ट केले. तसेच या कार्यालयांशी संपर्क करायचा असल्यास ०२५१ २२३०५०५, ०२५१ २२३०८८८ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच ेँ05@ेंँं३१ंल्ल२ूङ्मे.्रल्ल या ई-मेलवर माहिती द्यावी, असे आवाहन ससाणे यांनी केले.
या वेबसाइटद्वारे अर्ज, रक्कम भरणा करण्यात येऊ नये. बँकेमार्फत ओटीपी, अन्य माहिती प्राप्त झाल्यावर अनोळखी व्यक्तीला कळवू नये, असे संजय ससाने यांनी सूचित केले आहे.
यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र दिले असून याची गंभीर दखल घेऊन चौकशीसाठी यंत्रणेला आदेश द्यावेत, अशी मागणी केली.