उल्हासनगरात बांगलादेशी घुसखोरांकडे बनावट पासपोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:49 AM2019-02-23T00:49:30+5:302019-02-23T00:50:05+5:30
पोलिसांची कारवाई : आरोपी पोलीस कोठडीत
ठाणे : मागील काही वर्षांपासून उल्हासनगरात अनधिकृतरीत्या वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने गुरुवारी मध्यरात्री अटक केली. त्यातील एकाने बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पासपोर्ट मिळवल्याची बाब तपासात समोर आली आहे. दोन्ही आरोपींना उल्हासनगर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
उल्हासनगर-४ येथील हनुमान कॉलनी, आशेळे गाव येथे काही घुसखोर बांगलादेशी वास्तव्यास असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. त्यानुसार, गुरुवारी मध्यरात्री दौंडकर यांच्या पथकाने छापा टाकून बांगलादेशातील जिल्हा खुलना येथील मूळ रहिवासी असलेल्या जहीर अन्नार मंडोले (२८) आणि शेमुल दाऊद खान (२६) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, ते मागील पाच ते सहा वर्षांपासून भारतात वास्तव्यास असल्याचे उघड झाले. त्यांच्याकडे बनावट जन्मदाखला, आधारकार्ड आणि पॅनकार्ड मिळाले. जहीर याने या कागदपत्रांवर पासपोर्ट तयार करून घेतल्याची बाबही पुढे आली असून, पोलिसांनी पासपोर्टसह बनावट कागदपत्रे आणि एक मोबाइल फोन जप्त केला आहे. जहीर पेंटिंगचे, तर शेमुल हा फि टरचे काम करतो. त्यांचे आणखी काही नातेवाईक भारतात वास्तव्यास आहेत का, त्यांचा देशविघातक कृत्यात सहभाग आहे का, आदी मुद्यांवर तपास सुरू आहे. आरोपींचे कॉल रेकार्डही तपासणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याविरोधात पारपत्र (भारतात प्रवेश) नियम १९५० चे कलम ३ (अ) ६ (अ) सह परकीय नागरिकांचा कायदा १९४६ चे कलम १४ अ अन्वये विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत.
घरमालकावर कारवाई?
बांगलादेशी नागरिकांना आश्रय देणाऱ्या घरमालकांनाही पोलीस चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.