भाडेतत्त्वावरील वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या ठगाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 20:28 IST2019-04-19T20:22:24+5:302019-04-19T20:28:20+5:30
जादा मोबदला देण्याचे अमिष दाखवित भाडेतत्वावर वाहने घेऊन नंतर तीच वाहने परस्पर परराज्यात विक्री करणाºया शेशोस्कर पुष्करण थंगील ऊर्फ अप्पू (३१) या ठकसेनाला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.

ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांची कारवाई
ठाणे : भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतलेल्या वाहनांची परस्पर परराज्यांत विक्री करून मालकांची फसवणूक करणा-या शेशोस्कर पुष्करण थंगील ऊर्फ अप्पू (३१, रा. मीरा रोड, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. पोलीस कोठडीदरम्यान त्याच्याकडून १७ लाख ५० हजारांची चार वाहने हस्तगत केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
कासारवडवली, पातलीपाडा, घोडबंदर रोड, लक्ष्मी प्लाझा येथील रहिवासी रोहन कचरे यांच्या मालकीची कार भाडेतत्त्वावर लावण्यासाठी शेशोस्कर याने मे २०१८ मध्ये गळ घातली होती. एका कंपनीमध्ये त्यांची कार भाडेतत्त्वावर लावल्यास चांगला आर्थिक फायदा करून देण्याचे आमिषही त्याने दाखवले. त्यासाठी महिना १७ हजार ६६२ रुपयांप्रमाणे ३३ हप्ते देण्याचे ठरले. ही कार त्यांच्याकडून घेतल्यानंतर ठरलेला १७ हजार ६३२ रुपयांचा हप्ता मात्र त्याने भरलाच नाही. शिवाय, त्यांची कारही त्याने परत केली नाही. याप्रकरणी कचरे यांनी शेशोस्कर याच्याविरुद्ध १३ एप्रिल २०१९ रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यातील आरोपी शेशोस्कर हा आपली ओळख लपवून केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या बाहेरील राज्यांमध्ये वास्तव्य करत असल्यामुळे तो ठाणे पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तो ठाण्यात येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक एस.बी. जाधव यांच्या पथकाने १० एप्रिल रोजी ठाणे जिल्हा रुग्णालयासमोरील बसथांब्यांसमोर सापळा लावला होता. याच सापळ्यामध्ये शेशोस्कर याला अटक करण्यात आली. त्याला १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. याचदरम्यान चौकशीमध्ये त्याने मुंबई, ठाणे, मुंब्रा, मीरा रोड आणि वसई आदी परिसरांतील अनेक गरजू वाहनमालकांची वाहने भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेऊन ती आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यांत विक्री केल्याचीही कबुली दिली. ही वाहने त्याने प्रत्येकी तीन ते चार लाखांमध्ये विकली होती. त्यानंतर, या संपूर्ण तपासासाठी एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. या पथकाने आंध्र प्रदेशातील गुडीवाडा येथून कासारवडवली, मुंब्रा, मीरा रोड, नयानगर या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातून चोरीस गेलेली प्रत्येकी एक अशा १७ लाख ५० हजारांची चार वाहने जप्त केली. त्याच्याकडून आणखीही अशाच प्रकारे वाहनचोरी आणि फसवणुकीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोणाचीही अशा प्रकारे वाहने भाडेतत्त्वावर घेतल्यानंतर फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी कासारवडवली पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी केले आहे.