महागात पडतोय ‘दुसरा’
By admin | Published: February 25, 2017 03:07 AM2017-02-25T03:07:17+5:302017-02-25T03:07:17+5:30
ठाणे महापालिकेतील मतमोजणीचा तपशील हाती येऊ लागल्यानंतर या आकड्यांच्या खेळात शिवसेना आणि भाजपानेच परस्परांना तब्बल ९२ मतदारसंघात झुंजवल्याचे दिसून आले आहे
ठाणे : ठाणे महापालिकेतील मतमोजणीचा तपशील हाती येऊ लागल्यानंतर या आकड्यांच्या खेळात शिवसेना आणि भाजपानेच परस्परांना तब्बल ९२ मतदारसंघात झुंजवल्याचे दिसून आले आहे. निकालाच्या आकड्यांत भाजपा जरी तिसऱ्या स्थानवर फेकली गेली असली, तरी ५३ मतदारसंघांत दुसरे स्थान पटकावल्याने शिवसेनेला पुढील राजकीय वाटचालीत भाजपाची दखल घ्यावी लागणार आहे.
शिवसेनेला ६७ जागांवर विजय मिळाला असला, तरी ३९ प्रभागांत तो पक्ष दुसऱ्या स्थानी असल्याने शिवसेनेच्या या विस्ताराचा विचार भाजपासह अन्य विरोधी पक्षांना करावा लागणार आहे.
मुंब्रा-कळवा भागात भक्कम पकडे असलेला पक्ष अशी राष्ट्रवादीची ओळख असली आणि मागील निकालाशी तुलना करता त्यांनी त्यांचा दुसरा क्रमांक आणि संख्याबळ राखले असले तरी १६ ठिकाणी तो पक्ष दुसऱ्या स्थानासाठी झगडल्याचे स्पष्ट होते.
अंतर्गत वादाचे ग्रहण असले तरी मुंब्रा परिसरात दोन जागा मिळवून राष्ट्रवादीला धक्का देणाऱ्या एमआयएमने मुंब्य्रातच
तब्बल नऊ जागांवर निकराची
झुंज देत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवल्याने राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते.
मोठी घसरगुंडी झालेली कॉंग्रेस केवळ सात जागांवर दुसऱ्या स्थानी आहे. मनसेला भोपळाही फोडता
आला नसला, तरी तीन जागांवर
त्यांनी चांगली लढत दिली आहे. (प्रतिनिधी)
शिवसेनेचा विस्तार वाढला
ठाण्यात स्वबळावर सत्ता हस्तगत करणाऱ्या सेनेने ६७ जागा मिळवल्या तरी तो पक्ष ३९ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात प्रभाग २, ४, ६, ७, ११, १२, १५, २१, २२, २३, २४, २५, २९, आणि ३१ चा समावेश आहे.
मनसेची छोटी झुंज
९९ जागांवर लढणाऱ्या मनसेला ठाणेकरांनी सपशेल नाकारले. त्यांच्या नवख्या उमेदवारांनी केवळ ३ जागांवरच दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. रिपाइं ऐक्यवादी गटाला आणि एका अपक्षाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.