बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, चुकीच्या उपचाराने १६ वर्षाच्या तरूणीचा तापाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:55 AM2017-09-02T01:55:50+5:302017-09-02T01:56:01+5:30
तापाच्या उपचारासाठी दवाखान्यात चालत गेलेल्या १६ वर्षाच्या मुलीचा ३ तासात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत असून
उल्हासनगर : तापाच्या उपचारासाठी दवाखान्यात चालत गेलेल्या १६ वर्षाच्या मुलीचा ३ तासात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत असून समाजसेवक शिवाजी रगडे यांच्यासह नगरसेवक गजानन शेळके यांनी झोपडपट्टीतील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी अशा डॉक्टरांना अभय देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महापालिकेचे तत्कलिन वैद्यकीय अधिकारी खरात यांनी १५ वर्षापर्वी बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडली होती. त्यावेळी अनेक डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाल्याने झोपडपट्टीतील अर्ध्या पेक्षा जास्त दवाखाने बंद झाले होते. मात्र कालांतराने पुन्हा असे दवाखाने उघडले असून लहान मुले, वृध्द, महिला, गरीब नागरिक यांच्या जिवाशी हे डॉक्टर खेळत आहेत.
धोबी खदान, शास्त्रीनगर येथे राहणारी सिमरन शर्मा हिला ताप येत होता. तिने शेजारील डॉक्टरांकडून तापाचे औषध घेतल्यावर रविवारी २७ आॅगस्टला शर्मा नावाच्या डॉक्टरकडे दुपारी साडे चार वाजता चालत गेली. डॉक्टरने तपासून सलग तीन इंजेक्शन दिली. मात्र तब्येत बिघडल्याने त्रिमूर्ती रूग्णालयात सहा वाजता दाखल केले. त्यांनी इंजेक्शन देऊन सायकांळी ७ वाजता क्रिटी केअर रूग्णालयात नेण्यास सांगितले.
क्रिटी केअरमधील डॉक्टरांनी सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी सिमरनला तपासून मृत म्हणून जाहीर केले. दुपारी साडे चार वाजता दवाखान्यात चालत जाणाºया मुलीचा ३ तासात मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला. बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे मुलीचा जीव गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सिमरचे वडील संभू शर्मा यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोषी डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला. हा प्रकार समाजसेवक शिवाजी रगडे, नगरसेविका कविता रगडे, नगरसेवक गजानन शेळके यांना समजल्यावर त्यांनी शहरातील बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. डॉ. राज रिजाणी कुठलीही कारवाई करत नसून त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही केला.