खोटे दस्तावेज तयार करून वृद्धाची जमीन हडप
By admin | Published: April 10, 2017 05:34 AM2017-04-10T05:34:43+5:302017-04-10T05:34:43+5:30
तलाठी सजा सरळगावमधील एका ९२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची जमीन खोटे दस्तावेज तयार करून
मुरबाड : तालुक्यातील तलाठी सजा सरळगावमधील एका ९२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची जमीन खोटे दस्तावेज तयार करून हडपण्याचा प्रकार यशोदीप सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापक यांनी संगनमताने केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत, न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा मुरबाड पोलिसांनी दाखल केला आहे.
तालुक्यातील नागाव येथील ९२ वर्षीय शेतकरी आंबो महादू हरड यांच्या मालकीची दोन एकर जमीन सरळगावच्या हद्दीत आहे. या जमिनीच्या बाजूलाच यशोदीप सामाजिक संस्थेची जमीन आहे. या संस्थेचे संस्थापक, व्यवस्थापक किरण श्रीमंत वायभट आणि गणेश जयराम हरड यांनी संगनमताने हरड यांची दोन एकर जमीन बोगस दस्तावेजाद्वारे संस्थेच्या नावावर करून घेतली. या जमिनीत हरड हरभरा, तूर, मूग अशा कडधान्यांची पेरणी करतात. त्यांची पाहणी करण्यासाठी ते जानेवारी २०१७ मध्ये शेतीकडे गेले असता, त्यांना आपल्या जमिनीला कोणीतरी सिमेंट पोल आणि तारेचे कम्पाउंड कोणीतरी घालत असल्याचे दिसून आले. याबाबत, त्यांनी विचारणा केली असता ही जमीन यशोदीप संस्थेची असल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याने लक्षात आल्यावर हरड यांनी तक्रार दाखल केली. पुढील तपास पो.ह. सुभाष जुंदरे करीत आहेत. (वार्ताहर)
व्यवस्थापक किरण वायभट व गणेश हरड यांनी ही जमीन संस्थेने विकत घेतल्याचे सांगून व्यवहार झाल्याची कागदपत्रे आंबो हरड यांना दाखवली. हरड यांना तेथे मारहाणही करण्यात आली. आपली जमीन कोणीतरी खोटे दस्तावेज तयार करून संस्थेला विकल्याची खात्री पटल्यावर त्यांनी थेट न्यायालयात दाद मागितली.