‘भांडवली अर्थव्यवस्थेच्या भल्यासाठी नोटाबंदीचा घाट’
By admin | Published: February 16, 2017 01:45 AM2017-02-16T01:45:27+5:302017-02-16T01:45:27+5:30
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी लोकांवर अचानक बंधनकारक केली, असे सांगितले जात असले तरी यामागचा खरा डाव भांडवली
ठाणे : काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी लोकांवर अचानक बंधनकारक केली, असे सांगितले जात असले तरी यामागचा खरा डाव भांडवली अर्थव्यवस्थेचा फायदा करून देणे हा असावा, असे मत ज्येष्ठ लेखक आणि अर्थसमीक्षक संजीव चांदोरकर यांनी व्यक्त केले. समता विचार प्रसारक संस्था आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेच्या समारोप सत्रात ‘नोटाबंदीचा ताळेबंद’ या विषयावर ते बोलत होते.
खरेतर, सरकारने नोटाबंदी नव्हे, तर नोटाबदल केला. एक हजारच्या जागी दोन हजाराच्या नोटा चलनात आणून सरकारने काय साधले? या देशातील सुमारे ८५ टक्के जनता कॅश आधारित व्यवहार करीत असताना त्या जनतेला कॅशलेस व्यवहाराकडे जबरदस्तीने ढकलणे लोकशाहीत बसणारे ठरते का, असा सवालही चांदोरकर यांनी केला.
सर्वसामान्य लोक कॅशमध्ये व्यवहार करतात, म्हणजे ते काळा पैसा निर्माण करतात, असे मानणे सर्वथा चुकीचे असून आयकरप्राप्त उत्पन्न नसणारे सर्वसामान्य या देशात सुमारे ८० टक्के लोक असून त्यांना असुरक्षित करणारे धोरण नोटाबदलीतून साधले गेले, असे ते पुढे म्हणाले.
कॅशलेस व्यवहारात प्रत्येक विनिमयाची किंमत चुकवावी लागते. साधा डेबिट आणि क्रेडिटकार्ड यातील फरकही ठाऊक नसणारी बहुसंख्य जनता या देशात असताना अशा तथाकथित सुधारणांसाठी २०१६ चा मुहूर्त योग्य होता का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. इंटरनेट, नियमित वीजपुरवठा यांची देशात आजही वानवा असताना ही उठाठेव अनाठायी होती.
मोबाइल कंपन्या, क्रेडिटकार्ड कंपन्या, इंटरनेट कंपन्या यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय झाला असावा. कारण, कॅशलेस व्यवहारांमुळे उपलब्ध होणारा ‘ग्राहक व्यवहार डेटा’ या कंपन्यांसाठी लाखमोलाचा असणार आहे. या संपूर्ण प्रक्रि येत भारतीय रिझर्व्ह बँकेचे अवमूल्यन झाले, हीदेखील चिंताजनक बाब असल्याचे चांदोरकारांनी पुढे नमूद केले. अध्यक्षस्थानी श्री समर्थ सेवक मंडळाचे अविनाश कोरडे होते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन, तर सुनील दिवेकर यांनी शेवटी आभारप्रदर्शन केले. (प्रतिनिधी)