रुग्ण दगावला असताना जिवंत असल्याची दिली खोटी माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:40 AM2021-05-13T04:40:52+5:302021-05-13T04:40:52+5:30
कल्याण : केडीएमसीच्या आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला असतानाही तो जिवंत असल्याची खोटी माहिती भाजपचे ...
कल्याण : केडीएमसीच्या आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला असतानाही तो जिवंत असल्याची खोटी माहिती भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने दिली आहे. याबाबत पवार यांनी संबंधितांविरोधात कारवाईची मागणी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
यासंदर्भात पवार म्हणाले, ‘एका रुग्णाच्या नातेवाइकांनी माझ्याशी संपर्क करून रुग्णाची स्थिती कशी आहे, याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा करण्यास सांगितले होते. त्यानुसार मी माहिती विचारली असता प्रशासनाने रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. मात्र, रुग्ण जिवंत असल्याची माहिती दिली. हीच माहिती मी रुग्णाच्या नातेवाईकांना दिली असता त्यांनी आमचा रुग्ण दगावला असल्याचे सांगितले. हा प्रकार ऐकून मला धक्काच बसला.’
ते पुढे म्हणाले, ‘माजी आमदाराला रुग्णालय प्रशासनाकडून खोटी माहिती दिली जात असेल? तर सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल? आर्ट गॅलरी रुग्णालयाविरोधात रुग्णाच्या नातेवाइकांच्या अनेक तक्रारी आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रुग्णालयास भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी दिलेल्या रुग्णालयाच्या विरोधातील तक्रारींचा पाढाच वाचला होता. एकूणच ही गंभीर बाब असून, मनपा आयुक्तांनी संबंधित रुग्णालय चालकाविरोधात कारवाई करण्याची गरज आहे.’
--------------